पिंपरी प्रतिनिधी:-
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागातील सह शहर अभियंता सुनील भागवाणी आणि कार्यकारी अभियंता विजय सोनवणे यांच्यावरील कथित आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचाराच्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिले आहेत. माजी उपमहापौर तथा नगरसेवक तुषार रघुनाथ हिंगे यांनी पत्राद्वारे केलेल्या गंभीर तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले आहेत. याप्रकारामुळे महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलेल्या तक्रारीनुसार, सह शहर अभियंता सुनील भागवाणी आणि कार्यकारी अभियंता विजय सोनवणे हे दोन्ही अधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून बांधकाम आणि परवानगी विभागासारख्या महत्त्वाच्या विभागात एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. एकाच पदावर दीर्घकाळ राहिल्यामुळे त्यांनी भ्रष्टाचाराचे अभेद्य जाळे निर्माण केले असून, आपल्या अधिकारांचा गैरवापर करून ते सर्रास आर्थिक पिळवणूक करत आहेत. बांधकाम विभागाकडे मंजुरीसाठी दाखल होणाऱ्या फायलींमध्ये जाणीवपूर्वक तांत्रिक अडचणी, उणिवा व त्रुटी निर्माण करण्याचे प्रकार त्यांच्याकडून सातत्याने केले जातात. त्यानंतर हे अधिकारी प्रत्येक फाईलमागे 5 ते 6 रुपये प्रति चौरस फूट या दराने मलिदा गोळा करीत असून, जोपर्यंत अनधिकृत पैशांची मागणी पूर्ण केली जात नाही, तोपर्यंत एकही फाईल पुढे सरकत नाही व मंजुरीची प्रक्रिया जाणीवपूर्वक रेंगाळली जाते.
त्याचबरोबर, विकास प्रकल्पांतील जागांचा मूळ नकाशा किंवा रस्ता बदलणे, मंजूर आरक्षणाचे कारण पुढे करणे तसेच कागदपत्रांमध्ये नाहक कायदेशीर अडथळे निर्माण करून बांधकाम व्यावसायिकांची मानसिक आणि आर्थिक पिळवणूक करण्याचे सत्र त्यांच्याकडून अविरत सुरू आहे. शासकीय पदाचा गैरवापर करून स्वतःचे हितसंबंध जोपासणारे आणि लाचखोरीला पाठीशी घालणारे हे अधिकारी महापालिकेची प्रतिमा मलीन करीत आहे. यामुळे प्रामाणिक व्यावसायिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची तातडीने व गांभीर्याने दखल घेत, सह शहर अभियंता सुनील भागवाणी आणि विजय सोनवणे यांची तातडीने बांधकाम परवानगी विभागातून अन्यत्र बदली करण्यात यावी. तसेच त्यांच्या या संपूर्ण कारभारासह मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे निर्देश दिले आहेत.
“पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम विभागात काही अधिकारी भ्रष्टाचाराचा कहर करत असून, फाईल्स अडवून नागरिकांची आणि व्यावसायिकांची आर्थिक लूट सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले असून, या दोषी अधिकाऱ्यांची केवळ इतरत्र बदली न करता त्यांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (ACB) कसून चौकशी झाली पाहिजे, जेणेकरून शहरात प्रामाणिक व पारदर्शक कारभार येईल.” माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक तुषार हिंगे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.































