चिंचवड प्रतिनिधी:-
बिजलीनगर येथील महावितरणच्या सबस्टेशनमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे चिंचवड, पिंपरी, थेरगाव, काळेवाडी, रहाटणी आणि पिंपळे सौदागर आणि परिसरातील वीजपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे.
स्फोटानंतर खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित परिसरातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. महावितरणच्या संबंधित पथकाने घटनास्थळी पाहणी सुरू केली असून, परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे पथक युद्धपातळीवर प्रयत्न करत असून, वीजपुरवठा नेमका कधी पूर्ववत होईल, याबाबत महावितरण कडून अधिकृतपणे माहितीची प्रतिक्षा आहे.






























