पिंपरी प्रतिनिधी:-
दुर्गादेवी उद्यान टेकडी, सेक्टर क्रमांक २३, निगडी येथील २२७ झाडांची कत्तल करून पाण्याची टाकी उभारण्याच्या प्रस्तावाला माजी उपमहापौर (तथा) विद्यमान नगरसेविका शैलजा मोरे यांनी विरोध केला असून तशा आशयाचे पत्र आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांना दिले आहे.
यासंदर्भात ऑटो क्लस्टर येथे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन सदर वृक्षतोडीस परवानगी देऊ नये, अशी मागणी केली. पाण्याची टाकी उभारणे आवश्यक असल्यास पर्यायी जागेची पाहणी करून वृक्षसंपदेचे नुकसान होणार नाही, अशा ठिकाणी प्रकल्प राबवावा, अशी भूमिका मांडली.
तसेच प्रकल्पाची सविस्तर माहिती व मंजुरीसंबंधी कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत आणि स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय घ्यावा, अशी विनंती केली.
विकासाला विरोध नाही, मात्र विकासाच्या नावाखाली २२७ झाडांचा बळी कदापि मान्य करणार नाही असेही निक्षून सांगितले.
दुर्गादेवी उद्यान टेकडीचे नैसर्गिक सौंदर्य आणि वृक्षसंपदा जतन करण्यासाठी आमचा लढा कायम राहील. असे यावेळी माजी उपमहापौर शैलजा मोरे म्हणाल्या .































