पिंपरी प्रतिनिधी:-
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या वतीने सुरू असलेल्या रस्ते कामादरम्यान वृक्ष संवर्धन नियमांचे उल्लंघन होत असल्याचा प्रकार निगडी प्राधिकरण परिसरात समोर आला आहे. भेळ चौक ते वाल्हेकरवाडी या मार्गावरील दुभाजकामध्ये वृक्षांच्या बुंध्याभोवती नियमानुसार मोकळी जागा सोडण्याऐवजी मुळांवरच खडी, दगड, सिमेंट व बांधकाम साहित्य सोबत काही ठिकाणी नागरिकांकडून टाकण्यात आलेला कचरा देखील आहे.
महापालिकेच्या स्थापत्य विभागाचे प्रमुख तथा शहर अभियंता म्हणून मनोज सेठिया हे कार्यभार पाहत आहेत. त्यांच्या विभागाच्या अखत्यारीत सुरू असलेल्या कामातच नियमांचे उल्लंघन होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ तसेच राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार वृक्षाच्या बुंध्याभोवती किमान एक मीटर त्रिज्येची मोकळी जागा सोडणे बंधनकारक आहे. मुळांवर काँक्रीटीकरण करणे, सिमेंट अथवा डांबर टाकणे हे अधिनियमाचे उल्लंघन ठरते. मात्र, सदर ठिकाणी या तरतुदींचे पालन करण्यात आलेले दिसून येत नाही.
वृक्षतज्ज्ञांच्या मते, मुळांवर सिमेंट व खडी टाकल्यामुळे मुळांना हवा व पाणी मिळत नाही. परिणामी मुळे कुजून झाडाची वाढ खुंटते व कालांतराने झाड वाळून जाते. मुळे कमकुवत झाल्यास वादळी वाऱ्यामध्ये झाड उन्मळून पडण्याचा धोका निर्माण होतो. घटनास्थळी घेतलेल्या छायाचित्रांमध्ये मुळांवर खडीचा ढीग व मोठा दगड पडलेला दिसत असून, परिसरात कचरा व प्लास्टिकही साचलेले आहे.
शहरातील वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी उद्यान विभागाची आहे. या विभागाचे प्रमुख मुख्य उद्यान अधीक्षक म्हणून महेश गारगोटे हे कार्यभार पाहत आहेत. मात्र, दुभाजकामध्ये उघडपणे नियमभंग होत असतानाही उद्यान विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे उद्यान विभाग निद्रिस्त अवस्थेत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
निगडी-प्राधिकरण हा पिंपरी विधानसभा मतदारसंघातील उच्चभ्रू भाग म्हणून ओळखला जातो. शहरातील आणि बाहेरील अनेक व्यावसायिक, उद्योजक, कलाकार तेथे वास्तव्य करतात. असे असतानाही मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. येथून निवडून आलेले लोकनियुक्त आमदार फक्त निवडणूक पुरतेच या भागात फिरतात, प्रत्यक्षात नागरिकांच्या समस्यांकडे, प्रश्नांकडे लक्ष दिले जात नाही, अशी भावना स्थानिकांमध्ये आहे.
या पार्श्वभूमीवर प्राधिकरणवासियांनी मुळांवरील सिमेंट, खडी व मलबा तात्काळ हटवून मुळे मोकळी करावीत, झाडांभोवती एक मीटर मोकळी जागा सोडून संरक्षक जाळी बसवावी, तसेच नियमभंग करणाऱ्या ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर वृक्ष अधिनियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. शहर अभियंता मनोज सेठिया व मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांनी तात्काळ पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.































