चिंचवड प्रतिनिधी:-
पिंपळे सौदागर परिसरातील रखडलेले रस्ते, वाढती वाहतूक कोंडी, बंद पथदिवे आणि अतिक्रमणाच्या समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका अनिता काटे, नगरसेविका कुंदा भिसे आणि नगरसेवक जयनाथ काटे आणि महापालिकेचे नगररचना उपसंचालक ललित खोब्रागडे यांनी संयुक्त पाहणी दौरा केला.
परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी, रात्रीच्या वेळेची सुरक्षितता आणि पायाभूत सुविधांच्या प्रगतीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता.
कुंजीर चौक ते मिलिटरी एरिया डी.पी. रोड: या प्रस्तावित डी.पी. रोडच्या कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक ती तांत्रिक व प्रशासकीय पावले तातडीने उचलण्याचे निश्चित करण्यात आले.
मिलिटरी हद्दीलगतचे बंद पथदिवे सुरू करणे: मिलिटरी हद्दीलगत नव्याने सुरू झालेल्या रस्त्याच्या कडेला असलेले बंद विद्युत पथदिवे तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या, जेणेकरून रात्रीच्या वेळी नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल.
कुणाल आयकॉन रोडवरील अतिक्रमण व वाहतूक कोंडी: कुणाल आयकॉन रोडवर फेरीवाले, अनधिकृत दुकाने आणि इतर अतिक्रमणांमुळे होणाऱ्या सततच्या वाहतूक कोंडीची गंभीर दखल घेण्यात आली. यावर त्वरित कारवाई करण्यासाठी श्री. शत्रुघ्न काटे यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधून मोहीम राबवण्याचा आग्रह धरला.
पदपथांचे (फुटपाथ) संरक्षण: पादचाऱ्यांच्या हक्काच्या पदपथांवर वारंवार होणारे अतिक्रमण कायमस्वरूपी रोखण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी योग्य कुंपण (फेंसिंग) किंवा सुरक्षा कठडे बसवण्याची शक्यता पडताळून त्यावर कार्यवाही करण्याचे ठरले.
द्वारका हाइट्सजवळील अपूर्ण रस्ता: द्वारका हाइट्सजवळील आर्मी बॅकसाईड रोडवरील सुमारे ३० ते ४० मीटरचा रखडलेला व अपूर्ण रस्ता तातडीने पूर्ण करून नागरिकांसाठी खुला करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
“पिंपळे सौदागरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. कुंजीर चौक ते मिलिटरी एरिया डी.पी. रोडचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे, कुणाल आयकॉन रोडवरील अतिक्रमण हटवून वाहतूक कोंडी फोडणे, पदपथांचे रक्षण आणि मिलिटरी हद्दीलगतचे बंद पथदिवे तात्काळ सुरू करणे या महत्त्वाच्या विषयांवर आज प्रशासनासोबत प्रत्यक्ष पाहणी करून ठोस निर्णय घेतले आहेत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून ही सर्व कामे युद्धपातळीवर मार्गी लावून नागरिकांना अधिक सुरक्षित व सुसज्ज सुविधा देण्याचा आमचा मानस आहे.” असे यावेळी बोलताना नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे म्हणाले.
या पाहणी दौऱ्यादरम्यान लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या समस्या प्रशासनासमोर प्रभावीपणे मांडल्या. नगर रचना उपसंचालक श्री.ललित खोब्रागडे साहेब यांनीही सर्व तांत्रिक बाबी तपासून या कामांना गती देण्याची सकारात्मक ग्वाही दिली. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या या संयुक्त पुढाकारामुळे पिंपळे सौदागरमधील रस्ते, प्रकाशयोजना आणि वाहतुकीचे प्रश्न लवकरच सुटतील, असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त होत आहे.






























