चिंचवड प्रतिनिधी:-
चिंचवडगाव येथील कुणाल मार्केट परिसरातील पार्किंगमध्ये २९ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे दीडच्या सुमारास भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. या आगीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या सुमारे २० ते २५ दुचाकी व चारचाकी वाहनांचा जळून अक्षरशः कोळसा झाला. या आगीची झळ इमारतीतील अनेक घरांनाही बसल्याने रहिवाशांचे मोठे नुकसान झाले. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर घडलेल्या या दुर्घटनेमुळे कुणाल मार्केटमधील रहिवाशांवर मोठे संकट ओढवले होते.
मध्यरात्री अचानक आग लागल्याने इमारतीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीची तीव्रता वाढत असल्याने अनेक रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशामक दलाचे जवान आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीने इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षिततेच्या दृष्टीने टेरेसवर हलविण्यात आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळण्यास मदत झाली.
या आगीत अनेक वाहनांचे नुकसान झाले, तर इमारतीतील काही घरांनाही आगीची झळ बसली. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर घरातील साहित्य, विद्युत वायर,वाहने आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याने रहिवासी आर्थिक व मानसिक अडचणीत सापडले होते.
या दुर्घटनेची माहिती मिळताच आमदार शंकर जगताप यांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेट दिली होती. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या प्रभागाचे नगरसेवक सुरेश भोईर यांनी कुणाल मार्केट येथे भेट देऊन दुर्घटनाग्रस्त परिस्थितीची माहिती घेतली. तसेच नुकसानग्रस्त रहिवाशांना या संकटातून सावरण्यासाठी मदतीचा हात पुढे करत २५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. संकटाच्या काळात नागरिकांच्या पाठीशी उभे राहत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली.
यावेळी कुणाल मार्केटचे रहिवासी योगेश मोरे, कुणाल मार्केट सोसायटीचे चेअरमन श्री. सिंग यांच्यासह इतर रहिवासी उपस्थित होते. दुर्घटनेनंतर निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत नगरसेवक सुरेश भोईर यांनी केलेल्या आर्थिक मदतीबद्दल कुणाल मार्केटमधील रहिवाशांनी त्यांचे आभार मानले आणि धन्यवाद व्यक्त केले.
संकटाच्या काळात लोकप्रतिनिधीने नागरिकांच्या मदतीला धावून जाणे महत्त्वाचे असते. कुणाल मार्केटमधील या दुर्घटनेनंतर नगरसेवक सुरेश भोईर यांनी दिलेल्या मदतीमुळे नुकसानग्रस्त रहिवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.






























