पिंपरी प्रतिनिधी: –
निगडी येथील सेक्टर क्र. २३ मधील दुर्गादेवी उद्यान टेकडीवर प्रस्तावित पाण्याच्या टाकीच्या कामासाठी तब्बल २७५ (१७५ + १००) झाडांची तोड करण्यात येणार असल्याची बाब समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करून टाकीसाठी पर्यायी जागेची निवड करावी, अशी मागणी माजी उपमहापौर शरद(उर्फ)राजू मिसाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी दिलेल्या पत्रात मिसाळ यांनी म्हटले आहे की, दुर्गादेवी उद्यान टेकडी ही केवळ एक मोकळी जागा नसून शहराच्या पर्यावरणीय समतोलाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला हरित परिसर आहे. या परिसरातील वृक्षसंपदा, नैसर्गिक हिरवळ आणि मोकळी जागा यामुळे परिसरातील नागरिकांना स्वच्छ हवा, आरोग्यदायी वातावरण आणि निसर्गाचा सहवास लाभत आहे.
या ठिकाणी पाण्याची टाकी उभारण्याच्या प्रस्तावित कामासाठी सुमारे २७५ झाडांची तोड करण्यात येणार असल्याची बाब अत्यंत चिंताजनक असून, शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीने त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, असे पत्रात नमूद केले आहे.
पाणीपुरवठा हा नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित महत्त्वाचा विषय आहे, याबाबत कोणतीही दुमत नाही. शहराच्या विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, विकास करताना अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक संपत्तीचा विनाकारण ऱ्हास होणार नाही, याची दक्षता घेणे ही प्रशासनाची तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे, अशी भूमिका मिसाळ यांनी मांडली आहे.
आज शहरामध्ये वाढते प्रदूषण, तापमानवाढ आणि कमी होत चाललेली वृक्षसंपदा ही गंभीर आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत दुर्गादेवी उद्यान टेकडीसारख्या हरित परिसराचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. एका बाजूला वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवायचे आणि दुसऱ्या बाजूला शेकडो वर्षे पर्यावरणाचा आधार ठरणाऱ्या वृक्षांची तोड करायची, ही विसंगती टाळणे आवश्यक आहे, असेही पत्रात म्हटले आहे.
त्यामुळे पाण्याच्या टाकीच्या प्रस्तावित कामाबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी उपलब्ध पर्यायी जागांचा तांत्रिक व प्रशासकीय स्तरावर सखोल अभ्यास करण्यात यावा. तसेच वृक्षसंपदेचे कमीत कमी नुकसान होईल, अशा पर्यायांचा प्राधान्याने विचार करण्यात यावा, अशी मागणी मिसाळ यांनी केली आहे.
या मागणीमुळे आता आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.






























