पिंपरी प्रतिनिधी:-
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभाग आणि अध्यक्ष मयुर जाधव युवा प्रतिष्ठान आयोजित महाआरोग्य शिबीर सप्ताह पिंपरी विधानसभा मतदारसंघात संपन्न गेले सात दिवस सुरू असलेल्या या आरोग्य शिबिराचा तब्बल बावीस हजार नागरिकांनी लाभ घेतला.
क्रिस्टल आय केअर, ओंकार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, जतन फौंडेशन आणि आरोग्य संजीवनी फौंडेशन यांच्या सहकार्यातून भव्य महाआरोग्य शिबिर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने गेले आठवडाभर पिंपरी विधानसभा मतदारसंघातील दापोडी, रामनगर-दत्तनगर-विद्यानगर, चिंचवड, पिंपरी गावठाण, आकुर्डी गावठाण, बोपखेल, कासारवाडी, इत्यादी ठिकाणी महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.
यामध्ये नागरिकांना शुगर, रक्तदाब, ताप, सर्दी खोकला, डोकेदुखी इत्यादी आजारांवर तपासणी व मोफत औषधं वाटप करण्यात आले. तसेच नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप करण्यात आले. खऱ्या अर्थाने नागरिकांना मदत होईल या भावनेतून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. शहरातील सर्वच ठिकाणी नागरिकांनी या शिबिराला चांगला प्रतिसाद दिला.
जवळपास बावीस हजार नागरिकांनी या मोफत महाआरोग्य शिबिरामध्ये विविध आजारांवर उपचार आणि औषधोपचार घतले. यातील आठ हजार चारशे रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली आणि पाच हजार सहाशे रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून मतदारसंघातील जवळपास साठ हजार नागरिकांपर्यंत पोहोचण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष मयूर जाधव यांना यश आले असून या माध्यमातून सक्षम आणि निरोगी मतदारसंघ बनविण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
या महाआरोग्य शिबिराच्या प्रसंगी शहरातील अनेक मान्यवरांनी भेटी देऊन या कार्याबद्दल मयुर जाधव यांचे कौतुक केले. लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व समाज बांधव, हॉस्पिटलचे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, मयुर जाधव युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी या सर्वांचे विशेष सहकार्य लाभेल.
आगामी काळात नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येतील असेही मयूर जाधव यांनी सांगितले.




