पुणे प्रतिनिधी (दिनेश दुधाळे) :-
नुकत्याच सुरू झालेल्या महामेट्रो प्रकल्पाला मराठी सिनेमाचे ९० च्या दशकातील सुपरस्टार महेश कोठारे यांनी भेट दिली. सोबत त्यांच्या पत्नी सौ. निलिमा कोठारे याही उपस्थित होत्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की पुणेकरांचे स्वप्न आता सत्यात उतरले आहे आणि एक पुणेकर म्हणून मला याचा किंचित जास्तच अभिमान आहे. महामेट्रोचे अधिकारी मनोज कुमार डॅनियल यांनी यावेळी मेट्रोच्या उपक्रमाबाबत श्रीयुत कोठारे यांना माहिती दिली माहिती ऐकल्या नंतर महेश कोठारे सर अवाक् च झाले कारण परदेशातील अद्ययावत तंत्रज्ञान महा मेट्रोने पुणेकरांच्या सेवेत आणले आहे. मेट्रोच्या फीडर सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना मेट्रोतून उतरल्यावर समोरच ई. व्हेईकल उपलब्ध असणार आहेत. जेणेकरून प्रवाशांना शहरात या टोकापासून त्या टोकापर्यंत सहजपणे जाता येईल. अशी माहिती एपिरॉन कंपनीचे संचालक श्री. रविंद्र जाधव आणि डॉ . सुमित खापर्डे यांनी सिने दिग्दर्शक श्री. महेश कोठारे यांना दिली. यावेळी महेश कोठारे म्हणाले की पुणे मेट्रोला फीडर सेवे मार्फत मोबाईल ॲप सोबत दुचाकी आणि तीन चाकी इलेक्ट्रीक वाहनांची सोय उपलब्ध होणार आहे.

ज्यामुळे ग्राहकांना पुणे मेट्रोसह या टोकापासून त्या टोकापर्यंत (फर्स्ट माईल आणि लास्ट माईल) कनेक्टिव्हिटीसाठी कोणतेही वाहन बुक करता येईल. याचे शुल्क राज्य सरकारच्या नियमावलीनुसार असेल . या सेवेमुळे पुण्यातील एकूण कार्बन फूटप्रिंट कमी करता येतील. पुण्यात सर्वाधिक आयसी इंजिन वाहने असल्याने पुण्यातील प्रदूषण सर्वाधिक आहे. मेट्रोच्या फीडर सेवे मार्फत पुणे शहराला वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण मुक्त करण्याचे महामेट्रोचे ध्येय आहे. मेट्रोच्या या पाऊल वाटेने पुणे शहराला पुर्ववत हरित करण्यासाठी आम्ही पुणेकर सदैव तत्पर आहोत.
पुणे मेट्रोच्या या पहिल्या वहिल्या प्रवासात सौ निलिमा महेश कोठारे ही आल्या होत्या. यावेळी त्यांनी सुद्धा उत्स्फुर्तपणे मेट्रो विषयी आपला अनुभव व्यक्त करत सर्वांना मेट्रोची सुविधा वापरण्यासाठी प्रोत्साहित केले. पुणे मेट्रोचा हा प्रवास सर्व पुणेकरांसाठी आल्हाददायक होणार असून पुणे शहराला एका वेगळ्या आणि सुंदर पद्धतीने पाहण्याची संधी महामेट्रोच्या माध्यमातून मिळणार आहे . आपल्या नातेवाईकांना घेऊन मेट्रोचा प्रवास करून सर्वांनी पुणे शहराला हरित करण्यासाठी हातभार लावला पाहिजे.” असे मनोगत व्यक्त केले.
या वेळी मेट्रो अधिकारी मनोज कुमार डॅनियल यांनी सांगितले की आम्ही पुणे मेट्रोमध्ये विविध क्षेत्रातील आणि उद्योगांमधील नामवंत व्यक्तींना आणि प्रसिद्ध व्यक्तींना आमंत्रित करण्यासाठी उपक्रम सुरू केले आहेत जे यशस्वी होतायत आणि पुणे शहरात जागतिक दर्जाच्या मास रॅपिड पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीमला प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या बरोबर प्रयत्न करत आहेत . – पुणे मेट्रो रेल्वे सेवा ही शून्य कार्बन उत्सर्जन आणि प्रदूषणरहित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या मेट्रो रेल्वे सेवांचा वापर करण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करणे, प्रेरित करणे, शिक्षित करणे आणि प्रोत्साहित करणे यासाठी सुसज्ज आहे . सुरक्षित, अखंड, आर्थिक आणि कार्यक्षम फर्स्ट आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्ट मेट्रो इंटिग्रेटेड बस आणि ई फिडर सेवांद्वारे पुणे शहराला अधिक हरित आणि राहण्यायोग्य शहर बनवणे हे पुणे मेट्रोचे ध्येय आहे. समान उद्दिष्टे आणि मिशन व्हिजन साध्य करण्यासाठी आमच्यात सामील होण्यासाठी महेश कोठारे सर हे पुणे मेट्रोचे स्वत:हून पुढाकार घेतलेले ब्रँड ॲम्बेसिडर आहेत. श्री महेश कोठारे यांनी पुणे मेट्रोला भेट दिल्याबद्दल आणि पुणे मेट्रो रेल्वे सेवांना प्रोत्साहन दिल्याबद्दल श्री मनोज कुमार डॅनियल यांनी श्री कोठारे यांचे आभार मानले.





