पिंपरी प्रतिनिधी:-
महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची, भक्ती व प्रेमाची शंभू-शतकांची परंपरा लाभलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंढरपूर येथून लंडनकडे प्रस्थान करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विठ्ठल दिंडीतील पवित्र पादुकांचे दर्शन सोहळा वाकड येथे संत तुकाराम मंगल कार्यालयात भाविकांच्या मोठ्या सहभागाने उत्साहात पार पडला.
ही ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आंतरराष्ट्रीय वारी दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी पंढरपूर येथून प्रारंभ झाली असून ती २१ जून २०२५ रोजी लंडन येथे पोहोचणार आहे. जगातील सर्वात मोठ्या अशा भक्तिपर परंपरेचा हा अनोखा उपक्रम २२ देशांतून प्रवास करत एकूण १८,००० किलोमीटरचे अंतर पार करणार आहे.
या वारीतील पहिल्या टप्प्यात वाकड येथील संत तुकाराम मंगल कार्यालयात पादुकांचे दर्शन सोहळा संपन्न झाला. सायंकाळच्या सत्रात वाकड आणि आजूबाजूच्या परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाचे सुंदर नियोजन श्री शंकरराव वाकडकर, पांडुरंग वाकडकर, चंद्रकांत देवकर, राहुल वाकडकर, अतुल वाकडकर, संतोष वाकडकर समस्त वाकड ग्रामस्थ वाकडकर कुटुंबीय व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. दर्शनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाची सोय देखील करण्यात आली होती.
वारीचे प्रमुख श्री अनिल खेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मी गेल्या ७ वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर अशी पायी वारी करतो. जगात इस्कॉन, अक्षरधाम, तसेच अनेक भारतीय देवतांची मंदिरे आहेत; मात्र पंढरपूरच्या विठ्ठलाची, संत परंपरेची ओळख आणि भक्तीचा अनुभव अजूनही जगाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचलेला नाही. यासाठीच ही वारी साता समुद्रापार नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे.”
खेडकर पुढे म्हणाले, “पादुका विमानातून नेण्याची सोय असताना देखील, जशी लाखो वारकरी संसार सोडून पायी वारी करतात, तशीच ही दिंडी २२ देशांतून कारने प्रवास करत लंडनला जाणार आहे. मॉरिशस, न्यू जर्सी, जर्मनीसारख्या देशांमध्ये भारतीय मंदिरे आहेत, पण विठ्ठलाची वारी आणि त्याची भक्तिपरंपरा तिथे पोहोचलेली नाही – ही मराठी माणसाची एक खंत होती.”
या उपक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार उदयनराजे भोसले, एमआयटी चे विश्वनाथ कराड, तसेच अनेक वारकरी संप्रदायांचे प्रमुख यांचे पाठबळ लाभले आहे.
यूकेमधील ४८ पेक्षा अधिक मराठी मंडळे, तसेच आखात, आयर्लंड, अमेरिका, जर्मनीमधील मंडळे या उपक्रमात सहभागी होत आहेत. तमिळ, गुजराथी, कानडी, तेलगू भाषिक भक्त देखील या सोहळ्यात सामील झाले असून, ते मराठी न समजूनही सहजतेने अभंग म्हणतात – ही वारकरी संप्रदायाची खरी जागतिक ओळख ठरत आहे.
या वारीच्या निमित्ताने लवकरच लंडनमध्ये भव्य श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारण्यात येणार आहे. ही केवळ इमारत नसेल, तर महाराष्ट्राच्या संत परंपरेचा, भक्तीचा आणि अभंगरूपी अध्यात्माचा जागतिक केंद्रबिंदू ठरणार आहे.
वाकड येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल वाकडकर परिवाराचे विशेष आभार मानण्यात आले. महाराष्ट्राच्या सातशे वर्षांच्या संत परंपरेचा सुवास जगभर दरवळणार असून, ही वारी भक्तीची सीमा पार करून मानवतेच्या एकतेचा संदेश घेऊन निघाली आहे.