पिंपरी प्रतिनिधी:-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. बुधवारी (दि. ९) हॉटेल रागा पॅलेस, मदर तेरेसा उड्डाणपूल, काळेवाडी, पिंपरी, पुणे १८ येथे सायंकाळी पाच वाजता या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहल यांनी मंगळवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, विविध पक्षांचे सन्माननीय पदाधिकारी व विविध सामाजिक संस्था, संघटना, मंडळाचे विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी योगेश बहल यांनी सांगितले की, माजी मंत्री स्वर्गीय प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यानंतर पिंपरी चिंचवड शहराला मंत्रीपदाचा दर्जा असणारे पद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मिळाले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या दृष्टीने हा एकनिष्ठ कार्यकर्त्याला मिळालेला सन्मान आहे. अण्णा बनसोडे यांनी यापूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती पदावर काम केले आहे. तसेच ते पिंपरी विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार म्हणून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आले आहेत. अण्णा बनसोडे हे पक्षाच्या प्रती एकनिष्ठ आहेत. शहरातील सर्वसामान्य गोरगरीब, उपेक्षित समाजात त्यांचा दांडगा संपर्क आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये विधानसभेचे उपाध्यक्षपद देऊन अण्णा बनसोडे यांना न्याय दिला आहे.
राज्यात आणि केंद्रात आता एका विचाराचे सरकार आहे. त्यामुळे वेगाने विकसित होणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराशी संबंधित अनेक प्रश्न, नागरी समस्या लवकर सुटतील असा विश्वास आहे. यामध्ये पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, वैद्यकीय सेवा सुविधा, वाहतूक व्यवस्था, पीएमपीएमएलची सेवा, विस्तारित मेट्रो प्रकल्प, गोरगरीब नागरिकांसाठी घरकुल प्रकल्प या विषयावर निर्णय होणे अपेक्षित आहे.




