कोल्हापूर प्रतिनिधी : – महाविकास आघाडीचे सरकार पडणार… तारीख सांगणार… आज ह्याच्याकडं ईडी जाणार.. उद्या त्याच्याकडं ईडी जाणार, असं म्हणणारे कोल्हापुरातील एक ज्योतिषी पुण्याला गेले आहेत, अशी जहरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर नाव न घेता केली. भाजपने केंद्रीय तपास यंत्रणेचे अवमूल्यन केल्याचा आरोपही कोल्हे यांनी यावेळी केला.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ खासदार कोल्हे यांची जाहीर सभा झाली. त्यात कोल्हे बोलत होते. ते म्हणाले की, कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती. पण, १०५ आमदार निवडून येऊनही घरी बसावे लागल्याच्या मळमळीतून भाजपने ही निवडणूक लादली आहे. शिवाजी पेठेत काश्मिर फाईल्सची तिकिटे वाटणाऱ्या भाजपला महागाई, गॅस, पेट्रोल दर कमी करण्याचेही पास कधी देणार हेही विचारा. राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीचे काम सुरू आहे. पण, भाजपची सत्ता होती, त्या वेळी समाधीसाठी फुटकी कवडीही दिली नसताना कोणत्या तोंडाने आमच्याकडे मते मागता, याचा भाजप नेत्यांना जाब विचारा, असे खा. डॉ. कोल्हे यावेळी म्हणाले.
डॉ. कोल्हे म्हणाले, ‘‘शिवजयंतीवेळी शिवाजी पेठेत एक लाखाहून अधिक लोक रस्त्यावर उतरून शिवरायांचा जयघोष करत होते. जी मिरवणूक देशाने अभिमानाने पाहिली. पण, ज्यावेळी राज्यपालांनी शिवरायांबद्दल अपशब्द काढले, त्या वेळी भाजपच्या एकाही आमदाराने त्यांचा निषेध केला नाही, हे विसरून चालणार नाही. भाजप म्हणते ७० वर्षांत कॉंग्रेसने काय केले, मग काश्मिर फाईल्स बघून आल्यावर तुमच्यातल्या किती जणांनी भाजपला विचारले की, तुम्ही केंद्रात सर्व शक्तिमान आहात मग ज्या काश्मिर फाईल्स चित्रपटात आम्ही पंडितांची अवस्था पाहिली त्या पंडितांच्या पुनवर्सनासाठी ८ वर्षात तुम्ही काय केले. याचे उत्तर भाजप देत नाहीत. कारण जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली तुम्हाला विभागले की ते राजकारण करायला रिकामे झाले.’’
छत्रपती मालोजीराजे म्हणाले, ‘‘जयश्री जाधव यांच्या विजयात शिवाजी पेठेचा सिंहाचा वाटा असणार आहे.’’ माजी आमदार राजेश क्षीरसागर ‘‘भाजप सत्तेत होते त्या वेळी माजी पालकमंत्र्यांनी कोल्हापूरसाठी काय केले याचे उत्तर द्यावे. शिवसेना जयश्री जाधव यांच्या मागे खंबीर आहे. त्यामुळे शिवसेना कोणाला मतदान करणार याची चिंता भाजपने करण्याची गरज नाही.’’ उमदेवार जयश्री जाधव, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे, विद्या पवार, आर. के. पोवार, सुरेश साळोखे, सुजित चव्हाण, पिंटू राऊत, रवि इंगवले उपस्थित होते.



