पिंपरी प्रतिनिधी:-
अजितदादांच्या प्रत्येक संघर्षात सावलीसारख्या खंबीरपणे उभ्या राहिलेल्या सुनेत्रा वहिनी आजही तितक्याच निर्धाराने उभ्या आहेत. काळजाला छेद देणाऱ्या वेदनांमध्येही त्यांनी डोळ्यांतले अश्रू पुसले नाहीत, कारण ते अश्रू केवळ दुःखाचे नव्हते ते दादांवरच्या निष्ठेचे, जनतेवरच्या प्रेमाचे होते. दादांच्या जाण्याने आपली माणसं परकी होतील का, हा प्रश्न मनात येण्याआधीच त्यांनी वेदना हृदयात दडवून दादांच्या विचारांची मशाल हाती घेतली. व ती सक्षमपणे धगधगती ठेवण्यासाठीच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा वहिनी अजित दादांच्या विचारांचा वारसा खंबीरपणे पुढे नेतील असे प्रतिपादन मा महापौर वैशाली घोडेकर (लोंढे) यांनी केले.
सुनेत्रा वहिनींनी घेतलेला हा निर्णय राजकीय गणितांचा नाही; तर रक्ताच्या नात्यांपेक्षाही खोल असलेल्या माणुसकीचा आहे. ‘दादा’ हे नाव केवळ एक व्यक्ती नव्हते, तर लाखो मनांचा विश्वास होता तो विश्वास तुटू नये म्हणून सुनेत्रा वहिनी स्वतःचं दुःख विसरून पुढे आल्या. लाडक्या बहिणींचा जो आत्मविश्वास तुटल्यासारखा वाटत होता, तो आत्मविश्वास आज त्यांच्या रूपाने पुन्हा श्वास घेतो आहे.
काळाच्या पुढे पाहणारी सुनेत्रा वहिनी यांची ही दूरदृष्टी पोरक्या झालेल्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत पुन्हा आशेचा दिप पेटवते आहे. आज त्या केवळ एका घराच्या नाही, तर लाखो मनांच्या आधारवड झाल्या आहेत. वेदनांवर मात करून उभी राहणारी ही ताकद, ही निष्ठा, ही माणुसकी हीच खरी दादांची परंपरा आहे आणि ती सुनेत्रा वहिनी पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून जिवंत ठेवतील असा विश्वास मा. महापौर वैशाली घोडेकर (लोंढे) यांनी व्यक्त केला.



