पिंपरी प्रतिनिधी;-
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये सुमारे ९५ टक्के पाणीसाठा उपलब्ध असताना शहरात सुरू असलेली पाणी कपात तात्काळ रद्द करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून केली आहे.
ई-मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही शहरात सुरू असलेल्या पाणी कपातीमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. अनेक भागांमध्ये कमी दाबाने किंवा अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने महिलांवर, ज्येष्ठ नागरिकांवर तसेच नोकरदार वर्गावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. घरगुती वापर, स्वच्छता, आरोग्य सेवा, शैक्षणिक संस्था, लघुउद्योग आणि व्यापारी आस्थापनांवरही या परिस्थितीचा विपरीत परिणाम होत असून अनेक नागरिकांना टँकरद्वारे पाणी खरेदी करण्याची वेळ येत आहे.
पवना धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना पाणी कपात कायम ठेवण्याचे कोणतेही औचित्य नसल्याचे श्री. वाघेरे यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे शहरातील सुरू असलेली पाणी कपात तात्काळ रद्द करून सर्व भागांमध्ये नियमित, पुरेशा दाबाने आणि सुरळीत पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होणाऱ्या भागांमध्ये तातडीने तांत्रिक उपाययोजना करणे, पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक पारदर्शक करणे, गळती व पाण्याची नासाडी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे तसेच भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्याचीही मागणी ई-मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित या महत्त्वाच्या प्रश्नाची महानगरपालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शहरातील पाणी कपात रद्द करावी आणि नियमित पाणीपुरवठा सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा नगरसेवक संदीप वाघेरे यांनी व्यक्त केली आहे.






























