पिंपरी प्रतिनिधी:-
वडार समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी संघटितपणे निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ‘मी वडार महाराष्ट्राचा’ या संघटनेच्या वतीने जानेवारी २०२७ मध्ये कोल्हापूर येथे भव्य महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या महामेळाव्यात केंद्रीय तसेच राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या उपस्थितीत वडार समाजाच्या विविध मागण्या शासनदरबारी प्रभावीपणे मांडून त्या मंजूर करून घेण्यासाठी व्यापक जनआंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे.
या महामेळाव्याच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून पिंपरी-चिंचवड येथे ३० ऑगस्ट रोजी ‘वडार समाज संकल्प मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. क्वालिटी सर्कल फोरम, टेल्को रोड, भोसरी येथे सकाळी ११ वाजता हा मेळावा होणार आहे. पुणे जिल्ह्याची जबाबदारी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी स्वीकारली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
‘मी वडार महाराष्ट्राचा’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले हे मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. समाजाच्या हक्कांसाठी केवळ मागण्या न करता संघटित शक्तीच्या माध्यमातून शासनाकडून मागण्या मंजूर करून घेण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात येणार आहे.
वडार समाजाच्या जातीच्या दाखल्यासाठी असलेली १९६१ ची पुराव्याची अट शिथिल करावी, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसह शासनाच्या विविध योजनांमधून समाजातील कुटुंबांना पक्की घरे मिळावीत, वॉर्डी व आर्टीच्या धर्तीवर ‘शुरवीर हरबा वडार रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट’ स्थापन करावे, बेरोजगारांना स्वयंरोजगार व लघुउद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, वसंतराव नाईक भटक्या-विमुक्त विकास महामंडळाकडून विनाअट कर्ज उपलब्ध करून द्यावे, भूमिहीन कुटुंबांना उपजीविकेसाठी जमीन उपलब्ध करून द्यावी, महिला बचत गटांना सवलतीच्या दरात धान्य दुकाने द्यावीत, रॉयल्टीची मर्यादा वाढवून सवलत द्यावी, तसेच दगडखाण कामगार व समाजातील बांधकाम क्षेत्राशी संबंधित घटकांना शासकीय व निमशासकीय बांधकाम कामांमध्ये पीडब्ल्यूडीमार्फत आरक्षण द्यावे, अशा प्रमुख मागण्या महामेळाव्यात मांडल्या जाणार आहेत.
वडार समाज हा कष्ट, श्रम आणि शिल्पकलेच्या बळावर महाराष्ट्राच्या विकासात योगदान देणारा समाज आहे. मात्र आजही समाजातील अनेक कुटुंबे मूलभूत सुविधा, शिक्षण, रोजगार, निवारा आणि आर्थिक स्थैर्यापासून वंचित आहेत. त्यामुळे हक्कांसाठी एकजूट आणि भविष्यासाठी संघर्ष या भावनेतून जानेवारीतील कोल्हापूर महामेळावा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
संकल्प मेळाव्यात समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ‘वडार समाज गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यंदाचा पुरस्कार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर हनुमंतराव भोसले, अवर सचिव मंत्रालय (मुंबई) मनोहर बंदपट्टे आणि सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल मोरे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
मेळाव्यास महापौर रवी लांडगे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक राहुल भोसले, अवर सचिव मंत्रालय मुंबई राजेश अलकटे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे स्वीय सहाय्यक यल्लप्पा गाडिवडर, मी वडार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष मोहिते, संपर्कप्रमुख सुधीर पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे, सहायक संचालक मंत्रालय राजू धोत्रे, वडार एकता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत विटकर, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अमोल धोत्रे, साई संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सतीश भोसले, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष शंकर चौगुले, महिला प्रदेशाध्यक्ष सुनीता जाधव, सहायक पोलीस निरीक्षक विजय धोत्रे, वडार मजूर शिल्प प्रतिष्ठानचे श्यामराव विटकर, सहायक पोलीस निरीक्षक पुणे ग्रामीण प्रकाश पवार, सहायक पोलीस निरीक्षक युवराज कळमुगटकी, सामाजिक कार्यकर्ते संदीपन झोबाडे आणि उद्योजक वसंत विटकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील संकल्प मेळाव्यातून जानेवारीतील कोल्हापूर महामेळाव्याची मोठी मोहीम सुरू होणार असून, वडार समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी महाराष्ट्रभरातील समाजबांधवांनी एकत्र येण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले आणि प्रदेश कार्याध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी केले आहे.






























