चिंचवड प्रतिनिधी:-
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकांना दिवाळीनिमित्त मोठा दिलासा मिळाला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ करिता आशा स्वयंसेविकांना प्रोत्साहन भत्ता अदा करण्याच्या विषयास स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे आशा स्वयंसेविकांच्या अनेक दिवसांच्या अपेक्षेला आणि कष्टांना योग्य न्याय मिळाला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत झोपडपट्टी व झोपडपट्टी सदृश भागासाठी गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यांना कामावर आधारित मोबदला दिला जातो. महापालिकेत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकांना दिवाळीनिमित्त आर्थिक वर्ष २०२५-२६ करिता प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सदर प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी सप्टेंबर २०२५ ते ऑगस्ट २०२६ हा कालावधी गृहीत धरून भत्ता अदा केला जाणार आहे. या कालावधीत किमान सहा महिने म्हणजेच १८० दिवस कामकाज केलेल्या आशा स्वयंसेविकांना या भत्त्याचा लाभ मिळणार आहे. यासाठी प्रोत्साहन भत्त्याची किमान मर्यादा ७,००० रुपये आणि कमाल मर्यादा १५,००० रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
सदरचा खर्च वैद्यकीय विभागाकडील कुटुंब कल्याण अंतर्गत असणाऱ्या ‘बोनस तथा सानुग्रह अनुदान’ लेखाशिर्षातून खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
“पिंपरी-चिंचवड शहराच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा म्हणून आशा स्वयंसेविका अहोरात्र मेहनत घेतात. तळागाळातील लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या या निरंतर सेवेचा गौरव व्हावा आणि त्यांना सणाच्या निमित्ताने आर्थिक हातभार लागावा, या उद्देशाने आम्ही या महत्त्वपूर्ण विषयास तात्काळ मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे आपल्या लाडक्या आशा भगिनींना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असून, त्यांची यंदाची दिवाळी अधिक आनंदात जाईल, याचा मला मनस्वी आनंद आहे.” असे यावेळी बोलताना स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे म्हणाले.






























