पिंपरी प्रतिनिधी:-
पिंपरी चिंचवड मधील काळेवाडी फाटा कस्पटे वस्ती येथून मानकरवस्ती मार्गे वाकडसह मुंबई-पुणे महामार्गाकडे जाण्यासाठी रस्त्यावर वाहनांची रांग लागलेली असते. मात्र, छत्रपती चौक ते मानकरवस्ती दरम्यान, महापालिकेचा सिमेंट रस्ता मंजूर असूनही रस्त्यासाठी लेखार्शिषावर तरतूद उपलब्ध नसल्याने तीन महिन्यापासून रस्त्याचे काम रखडलं आहे. या रखडलेल्या कामामुळे भाजपच्या माजी नगरसेवकाच्या जनसंपर्क कार्यालयासमोर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने निधी नसल्याचे कारण देत रस्त्यांच्या कामास जाणिवपुर्वक विलंब लावला आहे. त्यामुळे नागरिक होणा-या त्रासामुळे संताप व्यक्त करत आहेत.
गेल्या पंचवार्षिक मध्ये भाजप महापालिकेत सत्तेत होते त्यावेळी प्रभाग क्रमांक 26 मधील वाकड-पिंपळे निलखकडे जाणारा काळेवाडी फाटा ते मानकरवस्ती पर्यंत सिमेंट रस्ता मंजूर केला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाने काळेवाडी फाटा ते छत्रपती चौकापर्यंत रस्त्यांचे काम पुर्ण केले आहे. पण छत्रपती चौक ते मानकरवस्ती रस्त्यांचे काम अद्याप अपुर्ण आहे. संबंधित ठेकेदाराने छत्रपती चौकापासून पुढे रस्त्याच्या एकाच बाजूने खोदाई करुन ठेवली आहे. त्यामुळे एकाच बाजूने वाहनाची ये-जा सुरु आहे. यामुळे रस्त्यावर अतिक्रमण, खड्डे आणि वाहनाची प्रचंड वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, छत्रपती चौक ते मानकरवस्ती पर्यंत सिमेंट रस्त्यासाठी स्थापत्य विभागाकडे निधी उपलब्ध नाही, रस्त्याच्या कामासाठी योग्य ती तरतूद न केल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. रस्त्याला तरतूद नसल्याने ठेकेदारानेही काम अपुर्ण ठेवले आहे. याच रस्त्यावर भाजपच्या माजी नगरसेवकाचे जनसंपर्क कार्यालय असतानाही महापालिका प्रशासनाने रस्त्याचे काम अपुर्ण ठेवले आहे. याबाबत स्थायी समितीच्या माजी सभापती ममता गायकवाड आणि माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना पत्र दिले आहे.
सदरील अपुर्ण रस्त्याबाबत आपण तातडीने लक्ष घालून रखडलेल्या रस्त्याच्या कामास योग्य ती तरतूद उपलब्ध करावी, तसेच तातडीने ह्या रस्त्याचे काम पुर्ण करुन नागरिक, वाहनधारकांना दिलासा द्यावा. लवकरात लवकर रस्त्याचे काम पुर्ण न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी दिला आहे. आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी दिला आहे.




