पिंपरी प्रतिनिधी: –
राज्यात विधान परिषदेसाठी भाजपने आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. यात पिंपरी चिंचवड मधून अमित गोरखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. गोरखे यांनी पिंपरी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती. त्यापूर्वीच त्यांना विधानपरिषदेची लॉटरी लागली आहे. यामुळे आता गोरखे यांच्या रूपात पिंपरी चिंचवड शहराला तरुण तडफदार आमदार मिळणार आहे.
भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी यासंदर्भात उमेदवारी जाहीर केली आहे. अमित गोरखे यांच्यासह माजी मंत्री पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत यांचीही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. २ जुलै उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
लोकसभा निवडणुकांचे निकाल लागताच राज्यात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. २ जुलै उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यापार्श्वभूमीवर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेसाठी काही नावांचा प्रस्ताव केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे पाठवला आहे. त्यामध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांचा समावेश होता. केंद्रीय नेतृत्वाकडून गोरखे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
अमित गोरखे यांना संधी मिळाल्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढणार असून पक्षाला आगामी निवडणुकीत फायदा होणार आहे. विधानसभेचे दोन आणि विधानपरिषदेचे दोन असे भाजपचे चार आमदार गोरखे यांच्या रूपाने होणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू अशी गोरखे यांची ओळख आहे.
गोरखे निवडून आल्यास शहराला विधानसभेचे दोन आणि विधानपरिषदेचे दोन असे चार भाजप आमदार पिंपरी चिंचवड शहराला मिळणार आहेत.
युवा नेतृत्व म्हणून अल्पावधीतच राज्याच्या राजकारणात ठसा उमटवणारे अमित गोरखे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरात ते वास्तव्यास आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष आहेत. मातंग समाजाचे महाराष्ट्राचे उच्चशिक्षित युवा नेतृत्व, एम.ए (सामाजिक शास्त्र), एमबीए (एचआर) पर्यंतचे उच्च शिक्षण घेतले आहे. नोव्हेल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे काम आहे. अनुसूचित जातीतील शैक्षणिक कार्यासाठी भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते, राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी लहानपणापासूनची नाळ आहे. न्यूज पेपर विक्रेता ते विधान परिषद सदस्य पदासाठीचे नॉमिनेशन असा त्यांचा प्रवास आहे.
अमित गोरखे यांची प्रतिक्रिया –
भाजपने माझी विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी निवड केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि पक्षाच्या नेत्यांचे आभार मानतो. वंचित आणि दलितांना न्याय देण्याचे काम पक्षाने केले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात स्थापनेपासून आजतागायत कुठल्याही पक्षाने आमच्या समाजाला विधानपरिषद किंवा राज्यसभेची उमेदवारी देऊ केली नव्हती. ती भारतीय जनता पक्षाने दिली. येणाऱ्या काळात नक्कीच कानाकोपऱ्यात वंचित आणि दलित समाजासाठी येणारा निधी पोचविण्याचा प्रयत्न करेन. असे अमित गोरखे म्हणाले.




