सर्वपक्षीय नेते आले सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकरांसाठी धावून…!
पुणे प्रतिनिधी:-
गेल्या तीन दिवसांपासून पुणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी,चिंचवड,भोसरी विधानसभा क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी झाडे मोडुन पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. याची माहिती मिळताच माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी थेट घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सकाळपासून घटनास्थळी स्वतः उपस्थित राहत नाना काटे यांनी संपूर्ण चिंचवड मतदारसंघातील पावसाचा आढावा घेतला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी, अग्निशामकचे कर्मचारी यांना पाचारण करून मोडलेली झाडे बाजूला काढणे, तसेच तुंबलेल्या पाण्याचा योग्य निचरा करण्याच्या सुचना दिल्या.

पुढील काही तासात पावसाचा जोर कमी नाही झाला तर चिंचवड विधानसभा क्षेत्रातील वाकड व नदीकाठच्या गावांची परिस्थिती बिघडू शकते याची पूर्वकल्पना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना फोन द्वारे कळवून त्यासाठी आवश्यक यंत्रणा पुरवण्याची विनंती केली आहे.

चिंचवड, भोईरनगर, इंदिरानगर, प्रेमलोक पार्क, बिजली नगर शिवनगरी या भागामध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने २५ ते ३० घरांमध्ये पाणी शिरले होते. या भागातील पावसाळी गटारे तुंबल्याने मोठ्या प्रमाणावर घरांमध्ये पाणी शिरले होते त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला याबाबतची माहिती मिळताक्षणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर नागरिकांच्या मदतीसाठी धावले. बिजली नगर शिवनगरी परिसरातील पावसाळी गटारे महापालिकेने स्वच्छ न केल्याने त्याचे पाणी मोठ्या प्रमाणात तुंबले आणि ते पाणी लोकांच्या घरांमध्ये शिरले. या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने त्या ठिकाणी रस्त्यावर सर्वदूर पाणी साचले होते. याबाबत महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली, तातडीने या भागातील पावसाळी गटारे स्वच्छ करावीत तसेच या भागातील घरांमध्ये साचलेले पाणी इलेक्ट्रिक मोटारींच्या माध्यमातून काढावे अशा सुचना भाऊसाहेब यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

पिंपळे सौदागरच नाही तर संपूर्ण राज्यभरात अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने प्रभागात काही ठिकाणी पुरस्थिती सारखी परिस्थिति निर्माण झाली आहे. अशा वेळी परिसरातील नागरिकांनी महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी केले आहे .
भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी चिंचवड विधानसभेतील सांगवी, पिंपळे गुरव पासून रावेत पर्यंत नदीलगतच्या लोकांना सुरक्षित स्थलांतरित करत हरतऱ्हेने मदत देण्यात येईल असे आश्वस्त केले.

पावसामुळे उदभवलेल्या परिस्थितीमुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी व त्यांच्यापर्यंत महापालिकेची मदत पोहोचवण्यासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी शहरातील अनेक भागात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. नवी सांगवी, रावेत या भागातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता पावसामुळे अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी तत्परतेने काम करीत आहे. प्रत्यक्ष जागेवर नागरिकांना मदत कशी पोहोचवता येईल यासाठी काम करीत आहे. कोणतीही अडचण निर्माण झाल्यास नागरिकांनी भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी तातडीने संपर्क साधावा, कोणत्याही वेळी लागणारी मदत पोहोचवण्याची ग्वाही जगताप यांनी नागरिकांना दिली.
त्याचप्रमाणे महापालिका आयुक्त व इतर अधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधून अडचणीत असलेल्या नागरिकांपर्यंत तातडीने आवश्यक ती मदत पोहोचवण्यास शंकर जगताप यांनी सांगितले. तसेच पावसामुळे आरोग्याच्या कोणत्याही समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी खबरदारी घ्यावी. त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी सुचना त्यांनी आयुक्त व इतर अधिकाऱ्यांना यावेळी केली.
शहरातील आपत्कालीन पूर नियंत्रण हेल्पलाइन…
◆ मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष: 020-28331111/67331111
◆ क्षेत्रीय कार्यालय (अ): 020-68334050/9922501454
◆ क्षेत्रीय कार्यालय (ब): 9922501456
◆ क्षेत्रीय कार्यालय (क): 020-68334550/9922501458
◆ क्षेत्रीय कार्यालय (ड): 020-6834750/9922501460
◆ क्षेत्रीय कार्यालय (इ): 020-020-68335050/8605722777
◆ क्षेत्रीय कार्यालय (फ): 020-68335350/8605422888
◆ क्षेत्रीय कार्यालय (ग): 020-68335550/7887879555
◆ क्षेत्रीय कार्यालय (ह): 020-68335750/9130050666,
अन्य हेल्पलाइन क्रमांक:
◆ सारथी हेल्पलाइन:- 8888006666
◆ परिवर्तन हेल्पलाइन:- 9379909090
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पावसाचा रेड अलर्ट घोषित झाला आहे. प्रशासनाने सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी घाट मार्गे प्रवास करणे टाळावे. पवना धरण परिसरात मुसळधार पाऊस कायम असल्याने दुपारनंतर पवना धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागात राहणाऱ्या लोकांनी काळजी घ्यावी. पवना, इंद्रायणी, मुळा नदी पावसाचा जोर वाढल्यामुळे प्रवाहापेक्षा जास्त क्षमतेने वाहत आहेत. आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नये. नोकरदारांनी शक्यतो घरून काम करण्याची (work from home) व्यवस्था करावी. प्रशासन आणि परिवर्तन हेल्पलाईन आपल्या मदतीसाठी सज्ज आहे. असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी नागरिकांना केले आहे.





