चिंचवड प्रतिनिधी:-
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये चांगलीच जुंपली आहे. महायुतीतीलच सहकारी पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्यावर ‘तुम्हाला लंगोट घालायला कोणी शिकवला?
असं वक्तव्य करीत प्रसारमाध्यमात त्यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा पिंपरी चिंचवड भाजपचे पक्षप्रवक्ते तथा माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे यांनी खरपूस समाचार घेत त्यांच्यावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे जोरदार हल्ला चढवला आहे.
पत्रकात राजाभाऊ दुर्गे यांनी म्हटले आहे की, हे प्रदेश प्रवक्ते आज ज्या पक्षाची पाठराखण करताना दिसतात, त्यांनाच विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या पक्ष प्रमुखांनी काय उपमा दिली होती याचा त्यांना विसर पडलेला दिसतो आहे. त्यानंतर याच पक्ष प्रवक्त्यांनी निवडणुकीत शरद पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. त्यांना कोणीही त्यावेळी कोणत्याही पक्षात घेतले नाही म्हणून हे महाशय महायुतीतील आमच्या सहकारी पक्षाकडे परत आले आहेत. अशा या सतरा पक्षांनी ओवाळून टाकलेल्या आमच्या महायुतीतील सहकारी पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्याच विरोधात प्रचार करत असताना, पक्षनिष्ठा व आता दाखवत असलेले बेडगी नेतृत्व प्रेम कुठे गेलं होतं ?
गेल्या दहा वर्षात पिंपरी-चिंचवड शहराचा विकास भाजपने केला आहे. हे शहराच्या जनतेला माहित आहे; अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा शास्तीकराचा प्रश्न कोणी मार्गी लावला हे देखील पिंपरी-चिंचवड करांना चांगलेच ठाऊक आहे.
विकासाबद्दल व योगदान बद्दल स्व. खा. आण्णासाहेब मगर, स्व. माजी मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे, स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेशदादा लांडगे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्याच बरोबर महाराष्ट्र भाजपाचे आमचे सर्वोच्च नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचेही मोठे योगदान आहे.
या सर्वांनी पिंपरी चिंचवड शहर कामगार नगरीचा नावलौकिक जगभर पोहचविला हे आपल्याला विसरता येणार नाही. आमदार महेश दादांनी त्यांच्या भाषणात अजित दादांचा कोणताही उल्लेख देखील केला नव्हता; त्यामुळे महेशदादा लांडगे यांच्यावर इथे आमच्या शहरात येऊन पत्रकार परिषद घेऊन टीका करण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात म्हणजेच महायुतीत प्रवेश करणाऱ्या काही नवख्या मंडळींनी हे वातावरण तयार करून त्यांना बोलायला भाग पाडले हे या प्रदेश प्रवक्त्यांना समजलंच नाही.
मुळात लंगोट बांधायला देखील पैलवानाचं काळीज लागतं. आमदार महेश लांडगे यांचे वडीलच त्यांचे वस्ताद आहेत. त्यांनीच महेश लांडगे यांना लंगोट बांधायला शिकवले आहे. ज्या बाप वस्तादाने त्यांना कुस्ती खेळायला शिकवली. लंगोट बांधायला शिकवला त्याच्यां बद्दल आ.महेश लांडगे नेहमीच कृतज्ञता व्यक्त करतात, अभिमान बाळगतात. अशा कृतज्ञशील व्यक्तीला तुम्ही कृतज्ञता शिकवायची गरज नाही.
कृतज्ञता काय असते ? हे आधी या पक्षात, नंतर दुसऱ्या पक्षात, पुन्हा दुसऱ्या पक्षातून पहिल्या पक्षात अशा सतत इकडून तिकडे, तिकडून इकडे उड्या मारणाऱ्या तुमच्या सारख्या अविश्वासू व्यक्तीला कशी कळणार ? जशी हवा लागल्यावर दिव्यातील वात फडफड करून विझू लागते, अगदी तशीच अवस्था आज या राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्ते महाशयांची झालेली आहे. त्यामुळे तुम्ही हिशोबात रहा आणि हिशोबत बोला. अन्यथा भोसरीचा आमचा तेल लावलेला पैलवान तुम्हाला कधी चीतपट करेल हे तुम्हाला कळणार देखील नाही. आम्ही युती धर्म पळतोय म्हणून शांत आहोत एवढेच काय ते आपण समजून घ्यावे.























