पिंपरी प्रतिनिधी:-
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या आवारातच मोठ्या प्रमाणात टाकाऊ टायर, लोखंडी साहित्य, जुनी वाहने व इतर स्क्रॅपचा ढिगारा पडून आहे. महापालिकेच्या आवारात स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२५ मोहिमेचे बोर्ड लावले असताना प्रत्यक्षात परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य दिसून येत आहे.
महापालिकेच्या जागेतच लोखंडी कचरा, टाकाऊ वाहनं व इतर साहित्य पडल्याने डासांची उत्पत्ती वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याला याचा मोठा धोका संभवतो.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, “महापालिकेने स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली जनजागृती केली असली तरी महापालिकेच्या आवारात कचरा व टाकाऊ साहित्य ठेवणे ही मोठी विडंबनात्मक बाब आहे.”
नागरिकांनी तातडीने हा कचरा हटवून परिसर स्वच्छ करण्याची मागणी केली आहे. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.
स्वच्छता मोहिमेचे फलक लावून प्रत्यक्षात अस्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यपद्धतीवर मोठं प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.