पिंपरी प्रतिनिधी:-
शहरातील स्वच्छतेचे गोडवे गात असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आवारातच अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. पालिकेच्या आवारातील एका कोपऱ्यात केबल्स व तारांमध्ये दारूच्या बाटल्या, प्लास्टिकचे पिशव्या, खाण्याचे रॅपर्स, गुटख्याच्या पुड्या व इतर कचरा पडलेला असल्याचे छायाचित्र व्हायरल झाले आहे.

महानगरपालिकेच्या आवारातच दारूच्या बाटल्या सापडणे ही अत्यंत धक्कादायक बाब असून, प्रशासनाच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शहरातील नागरिकांना स्वच्छतेचे धडे देणाऱ्या पालिकेच्या घरातच अशी अस्वच्छता आणि बेकायदेशीर दारू सेवनाचे पुरावे मिळणे चिंताजनक आहे.नागरिकांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “शहराला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असलेल्या संस्थेच्या आवारातच असे प्रकार घडत असतील, तर सामान्य नागरिकांकडून काय अपेक्षा ठेवायची?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक पातळीवर जोर धरत आहे.




