संगमनेर प्रतिनिधी:-
संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चंदनापुरी घाटात टेम्पो ट्रॅव्हलर बसने अचानक पेट घेतला. ही घटना शनिवार दिनांक 28 मे रोजी सकाळी साडेसात ते पावने आठ वाजेच्या दरम्यान घटना घडली आहे.
शिर्डी वरुन संगमनेर मार्गे भीमाशंकर ला दहा प्रवासी घेऊन चाललेली बस क्रमांक एम एच १२ के आर ०४३४ ही शनिवारी सकाळी चंदनापुरी घाटात आली असता अचानक गरम झाली. चालकाच्या लक्षात येताच त्याने बस रस्त्याच्या बाजूला घेतली व प्रवाश्यांना बस मधून खाली उतरण्याची सुचना केली. त्याच दरम्यान बसने अचानक पेट घेतला. व थोड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण केले. केवळ दैव बलवत्तर तसेच चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
घटनेची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, नारायण ढोकरे, पंढरीनाथ पुजारी यांसह हायवे प्रशासन घटनास्थळी पोहोचले व अग्नीशमन बंडाला पाचारण करुन ही आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू केले. ह्या घटनेमुळे वाहणांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही आग शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.




