मावळ प्रतिनिधी:-
तळेगाव दाभाडे शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या आंध्र धरण पाणी प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या फिल्टर प्लांट आणि पाण्याच्या टाकीसाठी लागणारी सुमारे साडेतीन एकर जागा “गुड ऑफ सर्व्हंट” संस्थेने नगरपरिषदेला उपलब्ध करून दिली असून, या जागेची सरकारी मोजणी रविवारी करण्यात आली. आमदार सुनील शेळके यांच्या विशेष प्रयत्नातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागला असून, शहराच्या वाढत्या लोकसंख्येला शुद्ध आणि मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी दिली.
आंध्रा धरणातून तळेगाव शहरासाठी दरवर्षी ५.०९४ दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत दररोज २२ दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा केला जाणार असून, १५ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आणि २० दशलक्ष लिटर क्षमतेचा अत्याधुनिक फिल्टर प्लांट उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे तळेगाव शहरातील पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात दूर होण्यास मदत होणार असून, नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. सोमवार दि. ३ ऑगस्ट रोजी झालेल्या सरकारी मोजणीवेळी “गुड ऑफ सर्व्हंट” संस्थेचे सचिव लाला सर, ॲड. सचिन नवले, नगरसेवक शिवाजी आगळे, निखिल भगत, सत्यम खांडगे, सूरज सातकर, प्रभुलाल तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. शहराच्या दीर्घकालीन पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, आगामी काळात या प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला जाणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले.






























