मावळ प्रतिनिधी:-
गेव्हंडे गावातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्मशानभूमीच्या प्रश्नावर ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी आमदार सुनील शेळके यांनी दिलेला शब्द पाळत प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीने प्रशासकीय हालचाली सुरू केल्या. आंदोलनाच्या दिवशीच आंदोलकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून, “आंदोलन मागे घ्या, तुमचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावतो,” असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी तात्काळ बैठक बोलावून प्रशासनाला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले.
आमदार सुनील शेळके यांनी गेव्हंडे ग्रामस्थांसह पुणे जिल्ह्याचे उपवनसंरक्षक अभिजित वायकोस यांची बैठक घेऊन स्मशानभूमीसाठी वनजमीन उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा केली. बैठकीत ३/२ चा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे आदेश देण्यात आले असून, एका महिन्याच्या आत आवश्यक मंजुरी देऊन जागा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
गेव्हंडे गावात स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले होते. आंदोलनानंतर आमदार सुनील शेळके यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे हा प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल पडल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे.
या बैठकीत गेव्हंडे गावासह मावळ तालुक्यातील वनहद्दीतील विविध विकासकामांचाही आढावा घेण्यात आला. गड-किल्ल्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांची सुधारणा, तीर्थक्षेत्रांचा विकास, पाण्याच्या टाक्यांसाठी जागा उपलब्ध करणे, प्रमुख रस्ते व प्रलंबित वीजवाहिन्यांची कामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
ग्रामस्थांनी आंदोलन केले आणि आमदार सुनील शेळके यांनी दिलेला शब्द कृतीत उतरवत तातडीने प्रशासन हलवले. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न आता निकाली निघण्याची आशा निर्माण झाली आहे.






























