मावळ प्रतिनिधी:-
मावळ तालुक्यातील पर्यटन विकासाला अधिक गती देतानाच पर्यटकांची वाहतूक कोंडीतून सुटका करून स्थानिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना आणखी एक महत्त्वाचे यश मिळाले आहे. कुरवंडे येथील टायगर व लायन्स पॉईंट विकास आराखड्यातील विविध कामांची पीएमआरडीएचे महानगर आयुक्त अभिजीत चौधरी यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात आली. यावेळी कुमार चौक ते टायगर पॉईंट या महत्त्वाच्या रस्त्याचे काम ७ मीटर रुंदीने वेगाने सुरू ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळांवर वाढणारी पर्यटकांची संख्या आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी आमदार सुनील शेळके सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही महत्त्वपूर्ण स्थळ पाहणी करण्यात आली. कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्त्याचे काम वेगाने पूर्ण झाल्यास टायगर पॉईंट, लायन्स पॉईंटसह परिसरातील पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.
लोणावळा नगरपरिषद हद्दीत रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेल्या उर्वरित जागांचे लवकरात लवकर भूसंपादन करून त्या जागा पीएमआरडीएच्या ताब्यात देण्याबाबतही नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांना स्पष्ट सूचना करण्यात आल्या. त्यामुळे रस्त्याच्या कामातील अडथळे दूर होऊन विकासकामाला गती मिळण्याची शक्यता आहे.
मावळचा पर्यटन विकास हा केवळ पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करण्यापुरता मर्यादित न राहता स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरावा, हा आमदार सुनील शेळके यांचा प्रयत्न आहे. पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते सुकर झाले, वाहतूक कोंडी कमी झाली आणि पर्यटकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा मिळाली, तर मावळमध्ये नव्या पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल. त्यातून हॉटेल, चहापानगृहे, स्थानिक खाद्यपदार्थ, वाहतूक, छोटे व्यावसायिक तसेच पर्यटनाशी संबंधित विविध व्यवसायांना चालना मिळून स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा या विकासकामामागील व्यापक उद्देश आहे.
‘मावळचा पर्यटन विकास अधिक गतिमान करणे, पर्यटकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ न देणे आणि स्थानिकांना पर्यटनातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे’ हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे आमदार सुनील शेळके यांच्या भूमिकेतून स्पष्ट होत आहे. प्रशासनातील विविध विभागांशी समन्वय साधून रखडलेली कामे मार्गी लावण्यावर त्यांचा भर असून, टायगर व लायन्स पॉईंट परिसरातील रस्ते आणि पर्यटन सुविधांच्या विकासामुळे मावळच्या पर्यटनाला नवी झळाळी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या पाहणी दौऱ्यावेळी पीएमआरडीएच्या सहआयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता, मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी, कार्यकारी अभियंता शिवकुमार कुपल, अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे सहआयुक्त हिम्मत खराडे, लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.






























