पिंपरी प्रतिनिधी:-
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील काळेवाडी, रहाटणी, विजयनगरसह विविध परिसरांमध्ये कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत असून नियमितपणे कचरा उचलला जात नसल्याने परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिका प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर यांनी केली आहे.
यासंदर्भात तापकीर यांनी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. या निवेदनात काळेवाडी, रहाटणी, विजयनगर, तापकीरनगर, भारतमाता चौक, नढेनगर, कोकणेनगर, पाचपीर चौक, आदर्शनगर आणि ज्योतिबानगर आदी परिसरांतील कचरा व्यवस्थापनाच्या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.

सदर परिसरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा साचत असून, नियमित कचरा संकलन आणि उचलण्याची प्रभावी व्यवस्था नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून भटकी कुत्री आणि मोकाट जनावरांचा वावरही वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होत आहे.
विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कचऱ्याच्या ढिगांमुळे डास, माश्या आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढत असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. महापालिका शहर स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवत असल्याचा दावा करत असताना, शहरातील महत्त्वाच्या निवासी भागांमध्ये कचऱ्याची समस्या कायम राहणे ही चिंताजनक बाब असल्याचे तापकीर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
महापालिका प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित आरोग्य व स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश द्यावेत. परिसरातील सर्व साचलेला कचरा त्वरित उचलण्यात यावा, नियमित कचरा संकलनाची व्यवस्था करण्यात यावी तसेच परिसरात वेळोवेळी औषध फवारणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, पुढील १५ दिवसांच्या आत कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेऊन प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मुदत प्रशासनाला देण्यात आली आहे. अन्यथा परिसरातील नागरिकांच्या वतीने बँड वाजवत, फटाके फोडत कचऱ्याचा मोर्चा महापालिकेवर काढण्यात येईल आणि महापालिका कार्यालयात कचरा टाकून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर यांनी दिला आहे.
या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासनाची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासन या मागणीची कितपत गांभीर्याने दखल घेते आणि नागरिकांना कचऱ्याच्या समस्येतून कधी दिलासा मिळतो, याकडे काळेवाडी, रहाटणी आणि परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.






























