पिंपरी प्रतिनिधी:-
स्वच्छ शहराच्या निर्मितीसाठी अहोरात्र झटणाऱ्या सफाई कामगारांचे कष्ट, त्यांचे शहरवासियांप्रती असलेले योगदान आणि स्वच्छतेबाबत प्रत्येक नागरिकाची जबाबदारी अधोरेखित करणाऱ्या ‘अवकारिका’ या सामाजिक आशयाच्या हिंदी चित्रपटाच्या ट्रेलर व पोस्टरचे अनावरण महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वच्छ भारत मिशनच्या संकल्पनेवर आधारित या चित्रपटाच्या माध्यमातून सफाई कामगारांच्या जीवनाकडे आणि त्यांच्या योगदानाकडे अधिक संवेदनशीलतेने पाहण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला आहे. शहर स्वच्छ दिसावे, नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे आणि सार्वजनिक परिसर स्वच्छ व सुंदर असावा, यासाठी सफाई कामगार दररोज प्रतिकूल परिस्थितीत काम करत असतात. मात्र, त्यांच्या या श्रमांकडे अनेकदा दुर्लक्ष होते. या अदृश्य श्रमांना समाजासमोर आणून सफाई कामगारांप्रती आदराची भावना निर्माण करण्यासोबतच ‘स्वच्छता ही केवळ त्यांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे’, हा विचार रुजविण्याचा प्रयत्न ‘अवकारिका’च्या माध्यमातून करण्यात आला आहे.
यावेळी नगरसदस्या सारिका मासुळकर, अभिनेता रोहित पवार, दिग्दर्शक सीए अरविंद भोसले, निर्माते भरत टिळेकर व अरुण जाधव यांच्यासह चित्रपटाशी संबंधित कलाकार, तंत्रज्ञ आणि मान्यवर उपस्थित होते. सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयाला मनोरंजन आणि कलात्मक अभिव्यक्तीची जोड देत नागरिकांच्या मनाला स्पर्श करणारा संदेश या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ‘अवकारिका’ची टीम केवळ पडद्यावर स्वच्छतेचा संदेश देण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. सीए अरविंद भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अजमेरा येथील एका उद्यानाची स्वच्छता आणि सुशोभीकरण करून त्याचा प्रत्यक्ष कायापालट केला आहे. नागरिकांच्या सहभागातून हे उद्यान आज स्वच्छता, खेळ, व्यायाम आणि विविध सामाजिक उपक्रमांसाठी उपयोगी ठरत आहे. त्यामुळे चित्रपटातून मांडलेला विचार प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचा आदर्शही या टीमने समाजासमोर ठेवला आहे.
याप्रसंगी महापौर रवि लांडगे यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करत सफाई कामगारांच्या योगदानाचा गौरव केला.
“आपण सकाळी घराबाहेर पडतो, तेव्हा आपल्याला स्वच्छ रस्ते आणि स्वच्छ परिसर दिसतो; मात्र त्यामागे अनेक सफाई कामगारांचे अथक परिश्रम असतात. त्यांच्या श्रमांचा सन्मान करणे म्हणजे केवळ त्यांचे कौतुक करणे नव्हे, तर आपण स्वतः कचरा न करणे आणि शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारणे होय. ‘अवकारिका’ हा केवळ चित्रपट नसून नागरिकांच्या विचारांना आणि स्वच्छतेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला सकारात्मक दिशा देणारा सामाजिक संदेश आहे.” स्वच्छ शहर निर्माण करण्याची जबाबदारी केवळ महानगरपालिका प्रशासन किंवा सफाई कामगारांवर टाकून चालणार नाही. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरापासून, सोसायटीपासून, परिसरापासून आणि सार्वजनिक ठिकाणांपासून स्वच्छतेची सुरुवात केली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, ओला व सुका कचरा वेगळा करणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि महानगरपालिकेच्या स्वच्छता उपक्रमांना सहकार्य करणे या छोट्या कृतींतून मोठा बदल घडू शकतो, असे महापौर लांडगे यांनी सांगितले.
“माझे शहर स्वच्छ ठेवणे ही माझीही जबाबदारी आहे,” ही भावना प्रत्येक पिंपरी-चिंचवडकराच्या मनात निर्माण झाली, तर स्वच्छतेची चळवळ खऱ्या अर्थाने लोकचळवळ बनेल. शहरासाठी काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांकडे केवळ कर्मचारी म्हणून नव्हे, तर शहराच्या आरोग्याचे आणि स्वच्छतेचे महत्त्वाचे आधारस्तंभ म्हणून पाहिले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
सामाजिक विषयाला प्रभावी कलात्मक माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवतानाच प्रत्यक्ष स्वच्छता व सुशोभीकरणाच्या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ‘अवकारिका’च्या संपूर्ण टीमचे महापौर रवि लांडगे यांनी विशेष कौतुक केले. या चित्रपटाचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचून सफाई कामगारांच्या श्रमांविषयी आदर वाढेल तसेच स्वच्छतेबाबत नागरिकांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडून प्रत्यक्ष कृतीला चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
स्वच्छ, सुंदर आणि हरित पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेच्या या चळवळीत सक्रिय सहभागी व्हावे, आपल्या सफाई कामगारांच्या योगदानाचा सन्मान करावा आणि ‘स्वच्छ शहर, माझीही जबाबदारी’ हा संकल्प प्रत्यक्ष कृतीत उतरवावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले.






























