पिंपरी प्रतिनिधी:-
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांशी संपर्क, प्रचाराचे नियोजन आणि संघटनात्मक समन्वयावर विशेष भर देण्यात येणार आहे. प्रत्येक स्तरावर जबाबदाऱ्यांचे नियोजन करून निवडणुकीच्या तयारीचे ‘मायक्रो प्लॅनिंग’ करण्यात येत आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून भाजप-महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी (दि. १८) केले.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रहाटणी येथील विमल गार्डनमध्ये मतदारसंघातील भाजपा नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा व समन्वय बैठक झाली. यावेळी जगताप यांनी निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे आणि पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारासाठी संघटनेतील सर्व घटकांनी समन्वयाने काम करण्याची गरज जगताप यांनी अधोरेखित केली. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजनबद्ध संपर्कावर भर देत पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि बूथस्तरावरील कार्यकर्त्यांनी परस्पर समन्वय ठेवावा, असे त्यांनी सांगितले.
जगताप पुढे म्हणाले निवडणुकीच्या कामाला गती देण्यासाठी सूक्ष्म नियोजन महत्त्वाचे आहे. प्रचाराचे नियोजन आणि मतदारसंपर्काची जबाबदारी यांची सांगड घालून प्रत्येक कार्यकर्त्याचा सहभाग वाढविण्यावर भर राहणार असल्याचे जगताप यांनी नमूद केले. संघटनेची ताकद आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या बळावर दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी एकदिलाने काम करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
बैठकीच्या निमित्ताने प्रभारी तुकाराम बजागे, संदेश भोईर, हरिश्चंद्र भोईर, दक्षिण भारतीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, ज्येष्ठ नेते सचिन साठे यांच्यासह भाजपाचे सरचिटणीस, मंडलाध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बूथप्रमुख उपस्थित होते.






























