पिंपरी प्रतिनिधी:-
गणपती विसर्जनासाठी कृत्रिम हौद आणि इतर सुविधा उपलब्ध करून देणे ही मनपाची जबाबदारी आहे. तरी देखील जास्तीत जास्त नागरिकांची सोय व्हावी यासाठी श्रीचंद आसवानी आणि त्यांचे सहकारी अनेक वर्षांपासून हा उपक्रम स्वतःहून राबवीत आहेत. मूर्ती विसर्जनानंतर निर्माण होणाऱ्या साहित्यातून कुंड्या बनवून देणे. हे देखील पर्यावरण पूरक आहे. मूर्तींच्या रासायनिक विघटनासाठी आवश्यक असणारे रसायन मनपा आयुक्तांनी उपलब्ध करून द्यावे यासाठी आयुक्तांशी बोलणार आहे असे अजित पवार यांनी सांगितले. पर्यावरण पूरक असा हा उपक्रम भाविकांच्या पसंतीस उतरत आहे. भाविकांना गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्याचे पहायला मिळते. पर्यावरणाच्या रक्षणासाठी असे उपक्रम श्रीचंद आसवाणी आणि ॲस्पीफ्लाय इनव्हायरमेंट या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येतात त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी पिंपरी येथे केले.
पिंपरी विशाल नगर येथे आसवाणी असोसिएटस आणि ॲस्पीफ्लाय इनव्हायरमेंटच्या वतीने घरगुती आणि सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी जागोजागी कृत्रिम हौद उभारण्यात आले आहेत. आज पर्यंत येथे दहा हजार पेक्षा जास्त मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. या ठिकाणी गुरुवारी दि. आठ रोजी अजित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी संयोजक विजय आसवानी, मार्गदर्शक श्रीचंद आसवानी, माजी महापौर संजोग वाघेरे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष अजित गव्हाणे, माजी उपमहापौर हिरानंद उर्फ डब्बु आसवानी, प्रभाकर वाघेरे, विठ्ठल काटे, राजू मिसाळ, माजी नगरसेविका उषाताई वाघेरे, प्रसाद शेट्टी, हरेश आसवानी, राजू आसवानी, अनिल आसवानी, रोहित आसवानी, राहुल आसवानी तसेच गणेश भक्त आणि पिंपरीतील व्यापारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याठिकाणी आरती करण्याची आणि निर्माल्य कलशची व्यवस्था, प्रकाश व्यवस्था तसेच खासगी जीवरक्षक नेमलेले आहेत. नागरिकांनी घरगुती आणि सार्वजनिक मंडळांनी गणपती विसर्जनासाठी या कृत्रिम हौदांचा वापर करून पर्यावरण रक्षणास हातभार लावावा असे आवाहन या उपक्रमाचे मार्गदर्शक श्रीचंद आसवानी यांनी यावेळी केले आहे.



