पिंपरी प्रतिनिधी:-
पिंपरी-चिंचवडमधील पाणी पुरवठा सक्षम करण्यासाठी हाती घेतलेल्या आंद्रा व भामा आसखेड प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. आंद्रा धरणातून ५० एमएलडी पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करुन नोहेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार आहे. त्यामुळे पाण्यासाठी शहरवासीयांना करावी लागलेली प्रतीक्षा आता संपली आहे.
चिखली येथे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने उभारलेल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाची पाहणी सोमवार दि. १७ रोजी करण्यात आली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप, माजी महापौर राहुल जाधव यांच्यासह मावळचे खासदार बारणे महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, प्रदीप जांभळे, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता देवांन्ना गट्टुवार, गोंडवाना इंजिनिअर्स लिमिटेडचे प्रतिनिधी उपस्थित होते.
तसेच, आंद्रा आणि भामा आसखेड प्रकल्पातून उचलण्यात येणऱ्या २६७ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्यावरील प्रक्रियेसाठी महापालिकेच्या वतीने चिखलीत ८ हेक्टर परिसरात उभारलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण करण्यात आले आहे. दोन लाईन जोडायच्या राहिल्या आहेत. त्याचे काम ८ दिवसांतच होईल. येत्या १५ दिवसांत पाणी सोडण्याची चाचणी होईल. आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी उचलण्यासाठी निघोजे येथील इंद्रायणी नदीवरील अशुद्ध जलउपसा केंद्राचे (जॅकेवल) काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी यावेळी लोकप्रतिनिधींना दिली.
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या टप्प्यात निघोजेतून ५० एमएलडी पाणी उचलले जाईल. पुढील तीन महिन्यात आणखी ५० एमएलडी पाणी उचलण्यात येईल. त्यातून समाविष्ट भागातील तळवडे, चिखली, मोशी, निघोजे आणि तळवडे येथील इंद्रायणी डुडुळगाव, चहोली, दिघी या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जाईल. त्यामुळे या भागाचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. या भागाला पाणी मिळाल्याने शहराच्या उर्वरित भागाला अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहर पाण्याच्या बाबतीत ‘आत्मनिर्भर’ होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. याचे समाधान वाटते.
– महेश लांडगे भाजप आमदार, तथा शहराध्यक्ष.

चिंचवड विधानसभा निवडणुक प्रभारी मा. नगरसेवक शंकर जगताप यावेळी म्हणाले की पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या २७ लाखांच्या घरांत आहे. आणि शहराचा नियोजनबद्ध होणारा विस्तार पहाता येत्या काळात ती आणखी वाढू शकते त्यामुळे पवना धरणाव्यतिरिक्त अन्य जलस्त्रोत निर्माण करणे काळाची गरज होती. त्यादृष्टीने भाजपाच्या काळात आंद्रा व भामा आसखेड प्रकल्प हाती घेण्यात आला. कोविडमुळे दीड-दोन वर्षे प्रकल्पाचे काम संथ गतीने झाले. मात्र, आता लवकरच पिंपरी-चिंचवडकरांना आंद्रा धरणातून पाणी मिळणार आहे. चिखलीतील प्रकल्प पूर्णत्वाकडे असून शहरातील पाणी पुरवठ्यावरील ताण कमी होणार आहे. समाविष्ट गावांतील नागरिकांनाही या प्रकल्पामुळे दिलासा मिळणार आहे.




