जुन्नर प्रतिनिधी :-
खासदार कोल्हे यांनी आज सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून सांगितले की शिवजयंतीच्या निमित्ताने असलेल्या शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहे.
कारण तसं शुल्लक आहे. गेल्या वर्षी त्यांनी पुरातत्व खाते आणि केंद्रात असलेल्या सरकारला निवेदन दिले होते. आणि आता या वर्षी संसदेतील भाषणात ही मागणी केली की किल्ले शिवनेरीवर कायमस्वरुपी भगवा झेंडा उभारण्यात यावा.
आणि ही विनंती मान्य न झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे असं ते म्हणतात. पण खासदार साहेब हे सोईस्कर विसरले आहेत की छत्रपतींनी स्वराज्य उभारणी केली ती याच गडकोटांच्या जीवावर आणि साडेतीनशे वर्षांनंतर आताही हे किल्लेच इतिहास सांगत उभे आहेत. छत्रपती आणि किल्ल्यांमुळेच भगवा झेंडा होता, आहे, आणि राहील झेंड्यामुळे छत्रपती झाले नाहीत की किल्ले झाले नाहीत. साडेतीनशे वर्षांपूर्वी भगवा झेंडा हा भागवत धर्माचे वारकरी संप्रदायाचे निशाण होता. तो छत्रपतींनी स्वराज्यासाठी स्विकारला कारण मराठी सर्व धर्मीयांना राजाश्रय मिळेल म्हणून आणि त्यांच्याकडे कोणीही शत्रू वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत करणार नाही. कारण छत्रपती त्यांच्या पाठीशी उभे आहेत हा संदेश त्यातून शत्रूला मिळेल म्हणून, महाराजांना जर किल्ल्यांपेक्षा रयते पेक्षा भगवा झेंडा जास्त प्रिय असता तर त्यांनी इतके बुलंद किल्ले उभारताना प्रत्येक किल्ल्यावर झेंड्यासाठी व्यवस्था केली असती तशी ती केली होती, पण कायमस्वरुपी नव्हती फक्त आणि फक्त शत्रूला दाखवण्यासाठी किल्ल्यांवर भगवा ध्वज असायचा जेणेकरून शत्रूला हे कळेल की किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आहे.
आता साडेतीनशे वर्षांनंतर ना कोणते शासन त्या किल्ल्यांची निगा राखते आहे. ना तत्कालीन कोणी शत्रू अस्तित्वात आहेत. मग छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाच्या भुमिका वठवून त्यांच्यावर आधारित चित्रपट बनवून गेल्याच वर्षी अशी काय उपरती झाली खासदार कोल्हेंना की त्यांना शिवनेरीवर भगवा ध्वज गरजेचा वाटू लागलाय.
मुळात हे विसरून चालणार नाही की छत्रपतीं मुळे भगवा दिसतो आहे. भगव्यामुळे छत्रपती नाहीत, छत्रपती घडले ते त्यांच्या आई वडिलांच्या शिकवणी मुळे, संस्कारांमुळे छत्रपतींनी स्वराज्य उभारणी करताना गावं उभी केली. रयतेला न्याय, आधार दिला. ते सगळीकडे भगवे ध्वज उभारत बसले नाहीत.
राहिला प्रश्न खासदारांच्या मागणीचा तर केंद्र सरकार सारासार विचार करून आणि वस्तुस्थिती पाहून त्यांच्या या मागणीचा विचार करेल पण अशा प्रकारे शासकीय कार्यक्रमाच्या दिवशीच स्वतः कडे लक्ष वेधून घेण्यासाठी खोडसाळपणे वागणे हे खासदारांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभणारे नाही.
जर लावायचाच आहे भगवा ध्वज तर मग खासदार झाल्यावर तीन वर्षांनी हे शहाणपण कोणी दिलं हा सर्वसामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे. जर त्यांना शिवनेरीवर भगवा ध्वज गरजेचा वाटत आहे, तर मग खासदारकीच्या पहिल्या दिवसापासूनच हा मुद्दा लावून धरायला हवा होता. पण गेल्या तीन वर्षांत साधी वाच्यता ही केली नाही मा. खासदार महोदयांनी आणि आता सांगत आहेत की गेल्या वर्षी पासून यांनी मागणी केली आहे म्हणून,
गेल्या वर्षीच मा. खासदार महोदय त्यांनी निर्माण केलेला चित्रपट पहायला यावे म्हणून देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत आवताण घेऊन गेले होते. त्यांनी म्हणे त्यांचे कौतुकही केले. त्या कौतुकाचा इतका प्रभाव पडला खासदारांवर की लोकं आणि विरोधक चर्चा करु लागले हे गृहमंत्र्यांच्या पक्षाच्या वळचणीला गेलेत. त्यामुळेच सध्या ज्या पक्षात आहेत त्यांच्या बहुतेक कार्यक्रमांना मतदार संघात बऱ्याचदा अनुपस्थित असतात. आता कारणं पुष्कळ आहेत.
पण खासदारांवर पडलेल्या याच प्रभावामुळे सध्या ते ज्या पक्षाचे खासदार आहेत त्यातील कार्यकर्ते आणि नेते हे देखील खुलेआम बोलत आहेत की खासदार आता आमचे नाहीत.
एकंदरीत खासदारांच्या आजूबाजूला वाढणारा नको त्या लोकांचा प्रभाव आणि गोतावळा या सगळ्याचे खासदारांना भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागले तर आश्चर्य वाटायला नको.