पिंपरी (प्रतिनिधी) –
नको नारळ.. नको कपबशी.. दोघंही एकाच माळेचे मणी.. आता आपला टीव्ही..च बरा म्हणत महापालिका सेवक पतसंस्था सभासदांनी एकच निर्धार करत यंदा परिवर्तन करण्याची वज्रमुठ बांधली आहे. महापालिका सेवकांच्या पतसंस्था निवडणुकीत शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचने प्रचारात आघाडी घेतली असून पॅनेलमधील सर्व तरुण उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार पक्का केला आहे. ही निवडणुक सभासदांनी हातात घेत पतसंस्थेचे लचके तोडणाऱ्या मनमानी, एकाधिकारशाही वृत्तीला आणि स्वार्थी, पक्षीय राजकारण करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करुन यंदा परिवर्तन घडवतील, असा विश्वास पॅनल प्रमुख संजय ऊर्फ बापू जगदाळे यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पंतसस्थेची पंचवार्षिक निवडणुक जाहीर झाली आहे. या पतसंस्थेचे मतदान मंगळवार दि. अकरा एप्रिल रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मनपा मुख्य कार्यालयात होणार आहे. या निवडणुकीत शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचच्या सर्व उमेदवारांना सभासदांचा वाढता पाठिंबा मिळू लागला आहे. पतसंस्था सभासदांनी निवडणुक हातात घेवून कर्मचा-यांच्या भविष्यासाठी नवीन चेह-यांना संधी देण्याचा इरादा पक्का केला आहे.
पॅनेल प्रमुख संजय जगदाळे म्हणाले की, महापालिका सेवक पतसंस्था ही आपल्या सभासदांच्या भागभांडवलावर उभी राहिली आहे. त्या पतसंस्थेचे आपण सर्वजण मालक आहात. पण सभासदांपेक्षा तज्ञ संचालकाने एकतर्फी कारभार चालविला आहे. पतसंस्थेतील कारभार कित्येक वर्ष सत्ताधा-यांच्या ताब्यात असल्याने मनमानी धोरण चालविले आहे. सभासदापेक्षा संचालकांनी मर्जीप्रमाणे कामकाज केल्याने काही सभासदांना कर्जापासून वंचित राहावे लागले आहे.
विचार करा, नाही तर पतसंस्थेला महासंघाप्रमाणे टाळे..
मागील चार-पाच वर्षात कर्मचारी महासंघातील पक्षीय राजकारणामुळे तो डबघाईला आला. दोघांच्या भांडणात कित्येक महिने महासंघाला टाळे लागले. आजी-माजी पदाधिका-यांनी कर्मचा-याच्या हितापेक्षा सत्ता आणि खुर्चीला महत्व दिले. त्यामुळे कर्मचा-याच्या हितापेक्षा आणि त्यांच्या अडीअडचणी, समस्या न सोडविल्याने कुणालाही न्याय मिळाला नाही. प्रत्येकजण आपआपली दुकाने थाटून स्वार्थी, मतलबी राजकारण करु लागले आहेत. त्यामुळे सभासदांनी विचारपुर्वक मतदान करायला हवे, आजी-माजी पदाधिका-यांच्या हातात सत्ता गेल्यास भविष्यात पतसंस्थेला महासंघाप्रमाणे टाळे लागल्याशिवाय राहणार नाही.
प्रत्येक कर्मचारी, सभासद हा पतसंस्थेचा मालक..
म्हणून आम्ही सभासदांचे हित पाहून महापालिका कर्मचा-यांच्या आग्रहास्तव शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचने स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे. पक्षीय जोडे बाजूला ठेवून सत्ता आणि खुर्चीसाठी नव्हे तर प्रत्येक कर्मचारी, सभासद हा पतसंस्थेचा मालक आहे, त्याचा सन्मान ठेवून त्यांच्याच हिताचे, भविष्याचे निर्णय घेत अडीअडचणी सोडविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील, त्यामुळे सर्व सभासद बंधू-भगिनींनो.. आपल्या भविष्याचा विचार करुन मतदान करताना भूलथापांना बळी न पडता टीव्ही चिन्हावर मतदान करुन प्रचंड मताने सर्व उमेदवारांना विजयी करावे, असेही आवाहन जगदाळे यांनी केले आहे.
हे आहेत उमेदवार..
महापालिका सेवक पतसंस्था निवडणुकीत सर्वसाधारण गटात ज्ञानेश्वर (अविनाश) इंगवले, परशुराम कदम, शंतनु कांबळे, बाळासाहेब कापसे, मनिष कुदळे, संतोष कुदळे, संजय जगदाळे, दत्तात्रय दुधे, इस्माईल शेख, महिला गटात माया वाकडे, अनुसूचित जाती-जमाती गटात प्रविण उघडे, इतर मागास वर्ग गटात हेमंत जाधव, भटक्या विमुक्त जाती गटात महेश कोळी हे उमेदवार आपले नशीब अजमावित आहेत.































