कात्रज प्रतिनिधी:-
कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल रस्त्यावर तीव्र उतारा मुळे अनेक अपघात झाले अनेकांना जीव गमवावे लागले. प्रत्येक वेळी अपघात झाले की अधिकारी, नेते येऊन पाहणी दौरे करून, बैठका घेऊन पत्रकार परिषदा घेऊन घोषणा करुन निघून जातात पुढे सगळं कागदोपत्रीच, ज्याप्रमाणे बेंगलोर कडून पुण्यात येणाऱ्या रस्त्यावर नऱ्हे पूल येथे मृत्यू दबा धरुन बसलेला असतो. त्याचप्रमाणे आता कात्रज चौक जेएसपीएम कॉलेज ते नवले पूल हा रस्ता ही मृत्यू चा महामार्ग झाला आहे. हे दोन्ही रस्ते (NHAI ) नॅशनल हायवे ऑथरिटी यांच्या अखत्यारीत येतात.
नागरिक प्रतिक्रिया :-
गेल्या तीन वर्षांपासून या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हजारो कोटी रुपये मंजूर झाले तरी तीन वर्षांत तीन किलोमीटर चा रस्ता ही पुर्ण करता आलेला नाही.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तीन किलोमीटर च्या या रस्त्याच्या दुतर्फा अनेक नवनवीन गृहप्रकल्प उभारले जात आहेत मोठ्या मोठ्या जाहिराती करून हायवे टच घर म्हणजे प्रगती भरपूर अनेक लोक बिल्डर च्या जाळ्यात फसून घरे घेतात. पण दुर्दैवाने तीन किलोमीटरच्या या रस्त्यावर सर्वसामान्य माणसाला अलिकडे पलिकडे ( क्रॉसिंग ) करण्यासाठी कुठेही भुयारी पादचारी मार्ग नाहीत. कुठेही पदपथ नाहीत. की कुठेही पथदिवे बसवलेले नाहीत. रोज शेकडो नागरिक जीव मुठीत धरून पळत पळतच रस्ता ओलांडून कोणी कामाला जातात, तर कोणी घरी, तर कोणी शाळेत मुलांना सोडायला आणायला.
महामार्ग असल्याने एकही वाहन हळू हळू येत नाही हजारो वाहनांच्या रांगांमधून लोक रोज रस्ता क्रॉस करताना दिसतात. त्यात रोज कुठेतरी छोटे मोठे अपघात होतात. रस्ता करताना अनेक चुका झाल्या आहेत असे येणारे जाणारे लोक सांगतात.

ज्याप्रमाणे बेंगलोरकडून पुण्यात येणाऱ्या रस्त्यावर तीव्र उतार आहे तसाच तीव्र उतार आंबेगाव येथील अभिनव महाविद्यालय ते नवले पूल पर्यंत केला आहे. याच उतारावर गेल्या तीन वर्षांत अनेक अपघात देखील झाले आहेत. तरीही महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांना या चुका कळत नाही की कळून देखील ते जाणूनबुजून दुर्लक्ष करतात. असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडलेला आहे.
कात्रज चौकापासून नवले पूल रस्त्याच्या दुतर्फा सर्व्हिस रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे परंतु त्यात काहीतरी गौडबंगाल आहे असे नागरिकांना वाटते कारण तीन किलोमीटर मधील कोणतेही काम पुर्ण नाही. रुंदीकरणाच्या भुसंपादनात ही घोळ आहे. अनेक ठिकाणी रस्त्याची रुंदी कमी जास्त आणि मागे पुढे केली आहे जिथे जिथे रस्ता केला आहे तिथे तिथे अनधिकृत पार्किंग केलेली वाहने लावलेली असतात.

अनेक ठिकाणी तर ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे.

कुठेही पदपथ नाहीत. रात्रीच्या वेळी तर सर्व सामान्य माणसे अंधारात चाचपडत जीव मुठीत घेऊन क्रॉसिंग करून घरी पोहचतात. कुठेतरी बातमी आली की दोन चार दिवस पोलीस प्रशासन जागोजागी थांबून कारवाईचा बडगा उगारतात पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. पोलिस नसले की लोक नो एन्ट्री तून वाहने दामटत कामाला, किंवा कोणत्याही कारणास्तव घाई घाईत स्वतः सोबत इतरांचा ही जीव धोक्यात घालून प्रवास करतात. अनेकदा अर्धवट रस्त्यावरून गेलेल्या वाहनांमुळे अपघात होतात, वाहतूक कोंडी होते. पण दुर्दैवाने ना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला कामाचा दर्जा सुधारायचाय ना पोलिस प्रशासनाला. या सगळ्यात रोज कुठेतरी सर्वसामान्य माणूस मरतो आहे. राज्यकर्ते नेते आणि प्रशासकीय अधिकारी मात्र घोषणा देण्यातच धन्यता मानत आहेत.
काही लोकप्रतिनिधींनी पादचारी पूल किंवा भुयारी मार्ग उभारण्याची मागणी ही महामार्ग प्राधिकरणाला केली आहे पण त्यांना ही अजून पर्यंत काही प्रतिसाद मिळाला नाही.




