पिंपरी प्रतिनिधी: –
पिंपरी राखीव मतदारसंघातील उमेदवारीसाठी काल रात्री खूप मोठ्या घडामोडी झाल्या. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांच्या विरोधातील असंतोष उफाळून बाहेर आला. आता बनसोडे यांचा पराभव करायचाच तर तोडिस तोड असा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने म्हणजेच महाविकास आघाडीने द्यावा अशी जोरदार मागणी पुढे आली. अजितदादांच्याच राष्ट्रवादीतील माजी नगरसेकांचे शिष्ठमंडळ रात्री दहा वाजता पुणे येथील पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटले. या जागासाठी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा जेष्ठ माजी नगरसेविका सिमा सावळे यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी सर्वांनी मिळून केली.
माजी उपमहापौर डब्बू आसवाणी, जगन्नाथ साबळे, माजी नगरसेवक जगदिश शेट्टी, हरेश आसवाणी, हरेश बोधानी, प्रसाद शेट्टी, काळुराम पवार, राजू बनसोडे, भाजपच्या माजी नगरसेविका आशाताई शेंडगे, चेतन घुले, शिवसेनेचे विशाल यादव आदींचा शिष्टमंडळात सहभाग होता.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वांचे म्हणने ऐकले. सविस्तर बोलण्यासाठी आज(शुक्रवारी) सकाळी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कार्यालयात सर्वांना बोलावले आहे. आमदार बनसोडे यांच्या विरोधातील सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकारी मिळून पहाटेच मुंबईला रवाना झाले.