पिंपरी (प्रतिनिधी) – महापालिका अतिक्रमण विभागाकडून पिंपरी, दापोडी, फुगेवाडी, कासरवाडी येथे महापालिकेच्या वतीने गोरगरीब दुकानदार, पथारीधारक व व्यवसायिक वर्ग यांच्यावर सर्रासपणे निर्दयीपणे अतिक्रमण कारवाई सुरू आहे.
एकीकडे कोरोना काळात आपले उद्योगधंदे गमावलेले गोरगरीब नागरिक छोटा-मोठा व्यवसाय असो, वा भाजी विक्री करून आपला उदरनिर्वाह करण्याचा व्यवसाय असो, मिळेल त्या मार्गाने जगण्याची धडपड करत आहेत तर दुसरीकडे यांच्यावर महापालिकेच्या वतीने हिटलरशाही पद्धतीने कारवाई केली जात आहे. तरी कारवाई करण्यापूर्वी महापालिकेने सर्वांची अधिकृत नोंदणी करून हॉकर्स झोनची निर्मिती करावी. त्यानंतरच अवैध व अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी युवासेनेचे युवाअधिकारी निलेश हाके यांनी ‘ह’ क्षेत्रिय अधिकारी थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.




