पिंपरी प्रतिनिधी:- राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी
( दि. ३१ मार्च रोजी चिखली येथील राष्ट्रवादीचे जैष्ठ नेते स्व. दत्ताकाका साने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी स्व. दत्ताकाकांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच साने कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.
आमदार रोहित पवार हे गुरुवारी एका कार्यक्रमानिमित्त चिखली- साने चौक येथे आले होते. या कार्यक्रमात त्यांनी स्व. दत्ता साने यांचे चिरंजीव व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश साने यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी साने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत साने कुटुंबियांसोबत संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून स्व. दत्ताकाका साने यांनी केलेल्या कार्याचा त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. दरम्यान, यश साने यांच्या हस्ते आमदार पवार यांचा सत्कार करण्यात आला.
पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेससाठी स्व. दत्ताकाका यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे आम्ही साने कुटुंबीयांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार आहोत. कोणतीही मदत लागल्यास नि:संकोचपणे सांगा. साने कुटुंबासाठी आणि यश साने यांच्यासाठी लागेल ती मदत करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार रोहित पवार यांनी दिली. यावेळी स्व. दत्ताकाका साने प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्त उपस्थित होते.




