पुणे प्रतिनिधी:-
पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी बाबूराव चांदेरे यांनी एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याच्या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ मुळे चर्चेत आली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत चांदेरे यांना चांगलेच सुनावले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी (दि. २५) सुसगाव येथे बाबूराव चांदेरे यांनी पोकलेन लावून खोदकाम चालवले होते. यावेळी तक्रारदार प्रशांत जाधव यांनी घटनास्थळी येऊन खोदकामाबाबत विचारणा केली. यावर चांदेरेंनी “तू कोण विचारणारा?” असे म्हणत त्यांच्या कानशिलात लगावली. यानंतर त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तींनी तक्रारदाराला धक्काबुक्की करत मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
तक्रारदार शंकर जाधव यांच्या तक्रारीवरून बावधन पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
अजित पवार यांची कठोर भूमिका..?
या प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “कुणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारच्या वर्तनाला पक्षात कोणत्याही प्रकारे स्थान नाही.”
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “मारहाण केलेली क्लिप पाहून मला अत्यंत वाईट वाटले. मी सकाळीच बाबूराव चांदेरे यांना फोन करून विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांच्या मुलाशी बोललो. अशा प्रकारच्या कृतीचं मी कदापी समर्थन करणार नाही. ज्यांनी तक्रार केली आहे, त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, आणि संबंधितांवर कडक कारवाई होईल.”
बाबूराव चांदेरे यांनी यापूर्वीही वादग्रस्त वर्तन केले आहे. काही महिन्यांपूर्वी एका रिक्षा चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशाच प्रकारचा व्हिडिओ समोर आल्यानंतर चांदेरे यांची अडचण वाढली असून उपमुख्यमंत्री अजित पवार चांदेरे यांची पक्षातून हकालपट्टी करणार की आणखी काही कारवाई करणार याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.




