पिंपरी, ५ जून (प्रतिनिधी):- औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडचा चेहरामोहरा बदलताना आता हे शहर ‘ग्रीन आणि सस्टेनेबल सिटी’ करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधत, येणाऱ्या पिढीसाठी ‘शुद्ध हवा आणि प्रदूषणमुक्त भविष्य’ देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने यात योगदान द्यावे. केवळ वृक्षारोपण न करता, त्या झाडांचे संवर्धन करत या मोहिमेला आता ‘लोकचळवळ’ बनवा,” असे आवाहन चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ‘एक पेड माँ के नाम’ आवाहनानुसार बारा घोलप महाविद्यालय परिसर आणि सांगवी जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानिमित्त आमदार जगताप बोलत होते. यावेळी सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, माजी महापौर माई ढोरे, नगरसेवक नवनाथ जगताप, हर्षल ढोरे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप, नगरसेविका पल्लवी जगताप, तृप्ती कांबळे, रवीना आंगोळकर, तसेच दुर्गाकौर आदियाल, महामंत्री मधुकर बच्चे, मंडल अध्यक्ष गणेश ढोरे यांच्यासह पक्षाचे विविध मंडल अध्यक्ष, बूथ प्रमुख, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. या निमिताने वृक्षसंवर्धन, जतन आणि पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्यात आली.
आमदार शंकर जगताप पुढे म्हणाले की, “झाड लावणे ही केवळ एक औपचारिकता नसून, ती भविष्यासाठी केलेली सामाजिक गुंतवणूक आहे. ही मोहीम आता शहरातील प्रत्येक गृहनिर्माण सोसायटी आणि घराघरापर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे. नागरिकांनी दत्तक घेतलेले एक झाड, हीच या मोहिमेची खरी यशस्विता असेल.” आधुनिक तंत्रज्ञान आणि निसर्ग यांचा मेळ घालत पिंपरी-चिंचवडला स्मार्ट आणि शाश्वत शहर म्हणून विकसित करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आज वृक्षारोपण मोहिमेत शोभेच्या झाडांऐवजी बकुळ, कडुलिंब, कदंब, ताम्हण, बहावा आणि महोगणी अशा बहुउद्देशीय आणि औषधी गुणधर्म असलेल्या देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. हे वृक्ष केवळ सावली देणारे नसून, स्थानिक पक्षी आणि कीटकांच्या जैवविविधतेसाठी पोषक आहेत. तसेच, महाराष्ट्राचे राज्यपुष्प असलेल्या ‘ताम्हण’ची लागवड करून सांस्कृतिक वारशाचेही जतन करण्यात आले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतील ‘शाश्वत विकास’ आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवडचा चेहरामोहरा बदलण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. शहराचा औद्योगिक विकास साधताना पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड दत्तक घेऊन वृक्षारोपण मोहिमेचे एका मोठ्या लोकचळवळीत रूपांतर करावे. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांना गती देत, निसर्गाच्या सोबतीने पिंपरी-चिंचवडला एक ‘ग्रीन आणि सस्टेनेबल सिटी’ बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” असे यावेळी बोलताना आमदार शंकर जगताप म्हणाले.






















