पुणे प्रतिनिधी:- पुणे तिथे काय उणे अशी म्हण प्रचलित आहे. परंतु दुर्दैवाने पुण्याची सांस्कृतिक, शैक्षणिक ओळख पुसली जाऊन भटक्या कुत्र्यांचे पुणे अशी ओळख होते की काय अशी भिती सामान्य पुणेकरांना वाटू लागली आहे…
पुण्यातील उपनगरे तर भटक्या कुत्र्यांचे हबच होतायत ते मजूर अड्डे असतात ना तिथे गेल्यावर रोजंदारीवर कामगार मिळतात तशी अवस्था धनकवडी, भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार, धायरी पलीकडे कोंढवा, धानोरी, लोहगाव, या नव्याने पुण्यात समाविष्ट झालेल्या गावांत आहे एकवेळ महापालिकेच्या सुविधा उपलब्ध असणार नाहीत पण भटकी कुत्री पावलोपावली असतील असे काही दिवसांनी लोकं आणि लोकप्रतिनिधी कुजबुजू लागले तर आश्चर्य वाटायला नको…. कदाचित आता बोलतच असतील
गेली अनेक वर्षे भटकी कुत्री ही समस्या पुणेकरांना भेडसावत आहे पण आता मात्र कहर झाला आहे रस्त्याच्या कडेला रस्त्याच्या दुतर्फा सगळीकडे या भटक्या कुत्र्यांचे जथ्थे घ्या जथ्थे पहायला मिळत आहेत. 
पुणेकर व्यायाम आणि खेळांच्या बाबतीत कुठेही मागे नाहीत ते जसे सकाळी तळजाई टेकडी, पर्वती, सिंहगडावर व्यायामासाठी गर्दी करतात तसेच रात्रीच्या न्याहरी नंतरही शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडतात पण जशी स्मार्ट सिटी पुणेकरांवर लादली गेली त्यातून पुढे पुण्यातील ठराविक वर्गातील लोकांनाच परदेशात राहण्याचा फिल मिळावा यासाठी घातलेला स्मार्ट सिटीचा घाट आणि त्यातील कामांतून पैशाने पैसा कसा वाढवायचा यात गुरफटलेले महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी मात्र भटकी कुत्री या गंभीर समस्येकडे सोयीस्कर कानाडोळा केला आहे.
राजकारणाच्या बाबतीतही पुणेकर आघाडीवरच असतात एखादा सर्वसामान्य माणूस तक्रार घेऊन गेला की हेच लोकप्रतिनिधी महापालिकेच्या सभागृहात आयोजित सर्वसाधारण सभेत आंदोलन करण्याची धडपड करणार जेणेकरून मिडिया मुळे आपण घराघरात पोहचू शकतो हे माहित असतं या कलाकारांना कलाकार मुद्दामच लिहिले कारण जितका अभिनय एखाद्या कलाकाराला उत्तम प्रकारे वड्या येणार नाही तितक्याच किंवा त्याहीपेक्षा जास्त ताकदीने राजकारणी वठवतात या सगळ्यात चार पाच दिवस बातम्या येऊनही प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो.
लोकप्रतिनिधींनी आंदोलनाचा स्टंट केला की तेवढ्या पुरतेच प्रशासन काम करते जिकडे तक्रार आली तिकडे भटकी कुत्री पकडण्यासाठी गाडी पाठवली जाते मुळातच असतात पन्नास – शंभर कुत्रे आणि हे जाऊन पकडून आणतात जास्तीत जास्त दहा तिही परत सोडतात पकडून आणल्यावर काय करतात हे मात्रे स्मार्ट सिटीच्या स्मार्ट प्रशासनालाच ठावूक इकडे कुत्र्यांची दहशत आणि नवनिर्मिती जोशात सुरू असते.
इतक्या लोकांच्या तक्रारी होतात लोकप्रतिनिधी आंदोलने करतात स्मार्ट सिटीचे स्मार्ट आयुक्त लोकांना आणि लोकप्रतिनिधींना आश्वासने देऊन वेळ मारुन नेतात. लोकप्रतिनिधी उगाच मिशीवर ताव मारुन लोकांना सांगतात बघा लवकरात लवकर तुमची समस्या सोडवली की नाही. पण ही समस्या कायम स्वरुपी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न ना प्रशासन करते ना राज्यकर्ते करताना दिसत आहेत.
लोक आपले पुन्हा एकदा या आशेवर जगतात की उद्यापासून आम्ही रस्त्यावरून जाताना भटकी कुत्री आमच्या आणि मुलांच्या मागे लागणार नाहीत. कुणाचाही या कुत्र्यांमुळे अपघात होणार नाही. कितीतरी लोकांनी भटके कुत्रे आडवे आले म्हणून अपघातात प्राण गमावले आहेत ज्यांच्या बाबतीत अशा घटना घडल्या त्या परिवाराचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही समस्या इतके गंभीर स्वरूप धारण करून उभी ठाकली आहे की आतातर मुले ही घराबाहेर पाठवताना सर्वसामान्य माणूस शंभर वेळा विचार करतो की आपल्या मुलाला – मुलीला रस्त्यावर किंवा काही कामानिमित्त बाहेर पाठवायचे की नाही कारण सोसायटीच्या इमारतीच्या बाहेर पडले की आजुबाजुला दहा बारा कुत्रे दबा धरून बसलेले असतात.
म्हणूनच सर्वसामान्य पुणेकर प्रशासन रुपात बसलेल्या या गेंड्याच्या कातडीतील अधिकाऱ्यांना, राज्यकर्त्यांना विचारु लागले आहेत की कधी आणि केव्हा थांबणार हे सर्व सामान्य माणूस रस्त्यावरुन जाताना भटक्या कुत्र्यांची शिकार झाल्यावर जेव्हा लोकांसमोर च हे कुत्र्यांचे जथ्थे लोकांचे लचके तोडून खाल्ल्यावर थांबणार की आणखी निष्पाप जीवांचे जीव गेल्यावर..?




