पिंपरी प्रतिनिधी:-
पिंपरी-चिंचवड शहराचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश
यांनी केलेल्या भ्रष्टाचाराविषयी डॉ. अशोक डोंगरे, सहा.पोलीस निरीक्षक यांचे एक पत्र व्हायरल झाले आहे. सदर पत्रामध्ये पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहरामध्ये कोण कोणता भ्रष्टाचार केला याविषयी संपूर्ण माहिती दिली आहे. या बाबत काही वर्तमान पत्रांमधून व समाज माध्यमातून बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. पत्रामध्ये गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले आहेत. याविषयी पिंपरी चिंचवड शहरामध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. नागरिकांमध्ये मोठया प्रमाणावर पोलीस खात्याविषयी संताप व्यक्त होत आहे. परंतु या प्रकरणाचे पुढे काय होणार याची उत्सुकता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
म्हणून या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी आणि झालेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे नागरिकांसमोर यावी या दृष्टीकोनातून मा. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे, मा. दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री तसेच मा. रजनीश शेठ पोलीस महासंचालक यांना निवेदन दिले असून त्या संदर्भात कृष्ण प्रकाश यांची चौकशी करावी अशा प्रकारचे निवेदन ॲड. गौतम चाबुकस्वार, माजी आमदार, पिंपरी विधानसभा यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
या बाबत या तीन ही मान्यवरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.























