चिंचवड दि २५ :-
प्रभाग क्रमांक २८ मध्ये गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या भीषण पाणी टंचाईची गंभीर दखल घेत, परिसरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी थेट प्रशासनाला धारेवर धरले आहे. नगरसेवक व भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका अनिता काटे आणि नगरसेविका कुंदा भिसे यांनी तातडीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय तातडीची बैठक घडवून आणली. या बैठकीत प्रभागातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावर तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले.
यावर्षी मान्सून लांबणीवर पडल्यामुळे आणि धरणातील मर्यादित पाणीसाठ्यामुळे शहरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उद्भवलेली ही ‘पाणीबाणी’ कशी नियंत्रणात आणायची आणि नागरिकांना किमान हक्काचे पाणी कसे उपलब्ध करून द्यायचे, यावर या बैठकीत गांभीर्याने विचार विनिमय आणि मंथन करण्यात आले.

बैठकीत बोलताना शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न (बापू) काटे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सुनावले की, “पावसाने ओढ दिल्यामुळे धरणात पाणी कमी आहे हे जरी खरे असले, तरी त्याचे नियोजन करण्याचे काम प्रशासनाचे आहे. प्रभागातील अनेक सोसायट्या आणि गृहप्रकल्पांना अत्यंत कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांचे हाल होत असताना प्रशासन शांत बसू शकत नाही. ज्या भागात पाण्याची समस्या गंभीर आहे, तिथे तात्काळ पाण्याचे प्रेशर वाढवणे किंवा पर्यायी व्यवस्था म्हणून महापालिकेमार्फत मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरळीत करणे गरजेचे आहे.”
पाणी सोडण्याच्या वेळा निश्चित नसणे आणि कमी दाबाने पाणी येणे या तांत्रिक त्रुटी तात्काळ दूर कराव्यात, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
लोकप्रतिनिधींच्या या आक्रमक भूमिकेनंतर पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी प्रभागातील सर्व जलवाहिन्यांची तपासणी (Line Checking) करून जिथे दोष आहेत ते तातडीने दुरुस्त करण्याचे मान्य केले. अंतर्गत व्हॉल्व्ह सिस्टीममध्ये बदल करून प्रत्येक भागाला समान पाणी मिळेल, याचे नियोजन पुढील २४ तासांत केले जाईल, असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.
या उच्चस्तरीय बैठकीला पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, स्थानिक पाणीपुरवठा निरीक्षक तसेच प्रभागातील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















