पुणे प्रतिनिधी:-
स्वातंत्र्य चळवळीचे प्रतीक असलेल्या आणि हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या गणरायाची आजची महाआरती मान्यवरांच्या शुभहस्ते मोठ्या भक्तिभावात पार पडली.
विधान परिषदेच्या उपसभापती आ. नीलम गोऱ्हे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये, प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र जोशी आणि प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन सुपेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महाआरती संपन्न झाली.
यावेळी ट्रस्टचे उत्सव प्रमुख पुनीत बालन आणि विश्वस्त मंडळाच्या वतीने सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ आणि गणपतीची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.
भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ साली इंग्रजांविरुद्ध लोकांना एकत्र आणण्यासाठी या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. राक्षसाचा वध करणारी ही ऐतिहासिक मूर्ती आजही त्याच स्वरूपात जपण्यात आली आहे. महाआरतीनंतर उपस्थित मान्यवरांनी श्रींचे दर्शन घेतले व उपस्थित भाविकांशी संवाद साधला.
याप्रसंगी ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.































