पुणे प्रतिनिधी:-
पुणे शहर दिवसेंदिवस वाढतच आहे नुसतेच वाढत नाही तर सोबत वाढतायत अतिक्रमणे, बेकायदा बांधकामे, वाहतूक कोंडी, या आणि अशा अनेक समस्या घेऊन पुणेकर नागरिक वावरतायत. पुण्याच्या अवतीभवती असलेली काही गावे मागील म्हणजे २०१७ च्या पंचवार्षिक मध्ये पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली.
गावे समाविष्ट झाली खरी पण पुढे काय आज ना उद्या समाविष्ट होणार हे लोकांना अपेक्षित देखील होते तसे झाले ही पण या समाविष्ट गावांच्या विकासासाठी आवश्यक ती ठोस उपाययोजना करण्यात महापालिका आयुक्त, जिल्हा प्रशासन, म्हणजे पर्यायाने जिल्हाधिकारी, आणि विभागीय आयुक्त या सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी समाविष्ट गावांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहिलेच नाही.
याच समाविष्ट गावांच्या यादीतील एक नाव म्हणजे आंबेगाव या आंबेगावचे क्षेत्र भारती विद्यापीठ ला लागूनच आहे तरी इथल्या रहिवाशांना अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, सुसज्ज शासकीय दवाखाना, पब्लिक ट्रान्सपोर्ट , या आणि अशा अनेक समस्यांना गेल्या पाच वर्षांपासून तोंड द्यावे लागत आहे.
आंबेगावातील नैसर्गिक तलाव देखील आता महापालिकेच्या दिमतीला उपलब्ध आहे. परंतु सरकारी अधिकाऱ्यांची उदासीनता आणि फक्त नावासाठी आणि स्वतःच्या व्यवसायांना शासकिय संरक्षण मिळावे म्हणून निवडून आलेले लोकप्रतिनिधी खरंच लोकांच्या भल्यासाठी काम करत आहेत का…? हा खरा प्रश्न आहे.

मागील पाच वर्षात तलावाच्या काठावर आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक बांधकामे झाली, आजमितीस सुरू ही आहेत. काही बेकायदा बांधकामे देखील आहेत. तलावाच्या परिसरात सिमेंट कॉंक्रिटवर प्रक्रिया करणारा प्रकल्प ही आहे. या सर्वांचे दुषित पाणी राजरोसपणे तलावात मिसळत आहे.
त्यामुळे तलावातील जीवसृष्टी तर नष्ट होतेच आहे परंतु एक पाण्याचा चांगला नैसर्गिक स्त्रोत लवकरच नष्ट होईल. तलाव परिसराच्या आजूबाजूला वाढणारे अनियंत्रित नागरीकरण, आणि या सगळ्यांकडे कानाडोळा करणारे स्थानिक नागरिक, सरकारी अधिकारी, लोकप्रतिनिधी, हे सर्वच जबाबदार आहेत.
गेल्या पाच वर्षांत तलावाला हर तऱ्हेने संरक्षित करुन त्यातील उपलब्ध पाणी आंबेगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी देता आले असते. परंतु सरकारी यंत्रणा काही धनदांडग्यांच्या दावणीला बांधली गेली आहे. त्यामुळे तलाव मोजतोय अखेरच्या घटका.
आपण बघतोच आहोत निसर्ग बदलला आहे. आणि गेल्या तीन चार वर्षांपासून पुण्यात अतिवृष्टी होते आहे कात्रज घाट आणि सह्याद्रीच्या रांगेतील एक रांग ही पुणे शहराला लागूनच आहे भविष्यात जर अतिवृष्टी झाली आणि दुर्दैवाने त्याचा फटका आंबेगावच्या या तलावाला बसला तर मात्र या सर्व यंत्रणाच आणि त्यातील संबंधित अधिकारी जबाबदार असतील.

पावसाळा संपून अवघे तीन महिने झाले आहेत तोच या तलावाला मिळणारे नैसर्गिक स्त्रोत मानवी हस्तक्षेपांमुळे आटले आहेत आणि याच स्त्रोतांच्या माध्यमातून जे पाणी मिळते आहे ते म्हणजे मानवनिर्मित प्रदुषित पाणी त्यामुळे तलावातील पाण्यावर जलपर्णी फोफावू लागली आहे.
























