पिंपरी प्रतिनिधी:-
भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियन (रजि.) यांच्या वतीने मंगळवारी (ता. २९ सप्टेंबर) चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात राज्यातील १४ जिल्ह्यांमधील ६ हजारांहून अधिक माथाडी पदाधिकारी सहभागी होणार आहेत. अशी माहिती माथाडी ट्रान्सपोर्टचे संस्थापक अध्यक्ष अनुप अविनाश मोरे यांनी रविवारी (ता. २७) काळेवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
माथाडी पदाधिकारी मेळाव्याचे उद्घाटन मंगळवारी दुपारी २ वाजता मा. श्री. रवींद्र दादा चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. या मेळाव्यात कामगारांचा रोजगार, सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा आणि कल्याणाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. माथाडी संघटना अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, तसेच कामगारांच्या समस्या प्रभावीपणे सोडविण्यासाठी आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांवर विचारविनिमय होणार आहे. २०३० पर्यंत ३० हजार पदाधिकाऱ्यांना संघटनेशी जोडण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक नियोजन व उपाययोजनांवरही यावेळी चर्चा केली जाणार असल्याची माहिती अनुप मोरे यांनी दिली.
त्याचबरोबर बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभात पिंपरी-चिंचवड परिसरातील उद्योग क्षेत्रातील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, पात्र उमेदवारांना ऑन-द-स्पॉट नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. पाचवी पासपासून उच्चशिक्षित उमेदवारांपर्यंत सर्व पात्र युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता व कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. तसेच, मेळाव्यात सहभागी होऊनही तात्काळ नोकरीची संधी न मिळालेल्या उमेदवारांसाठी ‘जॉब कार्ड’ उपक्रम राबविण्यात येणार आहे.






























