पिंपरी प्रतिनिधी :-
पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारलेला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पुतळा ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ ला ऐतिहासिक मानवंदना देण्याकरिता गतवर्षी मोशीत ढोल-ताशांचा विश्वविक्रमी निवाद करण्यात आला. यावर्षी पुन्हा एकदा या गगनभेदी सोहळ्याने शिव-शंभू विचारांचा गजर होणार आहे. ‘‘रणवाद्य’’ म्हणून हिंदवी स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष असलेले ढोल-ताशा पथके यासाठी महाराष्ट्रभरातून पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल होणार आहेत.
रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात हा सोहळा होणार आहे. आयोजित पत्रकार परिषदेत आयोजकांनी ही माहिती दिली. हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड आणि ढोल-ताशा महासंघ, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम होणार आहे.
यंदा पाच हजारांहून अधिक ढोलवादकांची नोंदणी पूर्ण झाल्याचे आयोजकांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विविध पथकांच्या सामूहिक वादनातून विश्वविक्रम नोंदवण्याचा त्यांचा संकल्प आहे. विक्रमाची अधिकृत पुष्टी कार्यक्रमानंतर होईल.
तसेच, पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात येत असलेल्या १२८ मीटर उंच भगव्या ध्वजासही या सोहळ्यात मानवंदना देण्यात येणार आहे. हा जगातील सर्वांत उंच भगवा ध्वज म्हणून ओळखला जाणार आहे. गतवर्षीच्या सोहळ्यानंतर यंदा अधिकाधिक ढोल-ताशा पथकांना एकत्र आणण्यासाठी तयारी सुरू असल्याची माहितीही आयोजकांनी दिली.
पत्रकार परिषदेला ढोल-ताशा महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पराग ठाकूर, पुणे अध्यक्ष अक्षय बलकवडे, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष विशाल मानकर, हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे उपाध्यक्ष गणेश महाराज भुजबळ आणि सदस्य प्रशांत वायकर उपस्थित होते. नागरिकांनी सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले.































