चिंचवड प्रतिनिधी:-
थेरगाव येथील सर्व्हे नं. २७ मध्ये एका बांधकाम व्यावसायिकाने सर्व नियम धाब्यावर बसवून थेट नैसर्गिक नाल्याचा प्रवाहच बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. युनिफाइड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन्स अंतर्गत नाल्याच्या दोन्ही बाजूंना ६ मीटरचा बफर झोन सोडणे बंधनकारक असताना, या नियमाचे उघडपणे उल्लंघन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, ड्रेनेज विभागाने यापूर्वीच पत्राद्वारे धोक्याचा इशारा दिला असतानाही, महापालिकेच्या बांधकाम व स्थापत्य विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत बांधकाम परवानगी दिल्याचा गंभीर आरोप होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य अजिंक्य बारणे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडे तक्रारीद्वारे केली आहे.
थेरगावमधील सर्व्हे नं. २७ मधून एक मोठा नैसर्गिक नाला वाहतो. कोणत्याही नैसर्गिक जलस्रोताचा प्रवाह बदलणे किंवा त्यावर बांधकाम करणे कायद्याने गुन्हा आहे. महापालिकेच्या ड्रेनेज विभागाने या जागेची पाहणी करून स्पष्ट शब्दांत लेखी पत्र दिले होते. या पत्रात म्हटले होते की, जर नाल्याचा मूळ मार्ग बदलला, तर भविष्यात या परिसरात तीव्र पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. नाल्याचा प्रवाह बदलल्यामुळे किंवा तो अरुंद केल्यामुळे नाल्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता प्रचंड प्रमाणात कमी होईल.
पावसाळ्यात आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरून मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे नियमानुसार नाल्याच्या दोन्ही बाजूंना ६ मीटरचा बफर झोन ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, ड्रेनेज विभागाच्या या तांत्रिक अभ्यासाला आणि इशाऱ्याला बांधकाम व स्थापत्य विभागाकडून केराची टोपली दाखवण्यात आली.
दुसरा धक्कादायक प्रकार म्हणजे, संबंधित जागेत एक जुनी विहीर अस्तित्वात आहे. बांधकाम व्यावसायिकाने हा नैसर्गिक पाण्याचा स्रोत जिवंत असतानाही, ती विहीर थेट गृहप्रकल्पाच्या पार्किंगच्या भागात समाविष्ट केली आहे. विहिरीच्या जागेवरच पार्किंगचे स्लॅब टाकून त्यावर संपूर्ण गृहप्रकल्प उभा केला जात आहे. नैसर्गिक विहिरीवर अशा प्रकारे बांधकाम करणे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत धोकादायक मानले जाते. भविष्यात जमिनीची धूप होऊन किंवा पाण्याच्या दबावामुळे पार्किंगचा भाग खचण्याची भीती जाणकराकडून व्यक्त केली जात आहे.
राज्य शासनाच्या यूडीसीपीआर नियमावलीनुसार, पर्यावरण आणि जलस्रोतांचे रक्षण करण्यासाठी नाल्याशेजारी बांधकाम करताना विशिष्ट अंतर (बफर झोन) सोडणे सक्तीचे आहे. या प्रकल्पात ६ मीटर अंतराचा नियम पूर्णपणे पायदळी तुडवण्यात आला आहे. विकासकाच्या फायद्यासाठी नैसर्गिक नाल्याची दिशाच वळवण्यात आली असून, यामुळे नैसर्गिक पर्यावरण साखळी धोक्यात आली आहे. ड्रेनेज विभागाचा स्पष्ट विरोध असताना, बांधकाम व स्थापत्य विभागाने कोणत्या निकषांवर या प्रकल्पाला मंजुरी दिली, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
या बेकायदेशीर बांधकामांमुळे भविष्यात या गृहप्रकल्पामध्ये राहण्यास येणाऱ्या निष्पाप नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यास संपूर्ण सोसायटी परिसर पाण्याखाली जाण्याची भीती आहे, तर विहिरीवरील बांधकामामुळे इमारतीचा पाया कमकुवत होऊन मोठी दुर्घटना घडू शकते. या गंभीर बाबीची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य बारणे यांनी महापालिका आयुक्तांकडे पुराव्यांसह लेखी तक्रार दाखल केली आहे.
थेरगांव येथील सर्व्हे नं.२७ मध्ये मे. सुखवानी असोसिएट्स या बांधकाम व्यावसायिकाने सुखवानी किंग्सली नावाने गृहप्रकल्प उभारला आहे. या गृहप्रकल्प जागेतील नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलला आहे. युडीसीपीआर अंतर्गत नाल्याच्या दोन्ही बाजूला ६ मीटर बफर झोन न ठेवता त्याचे उल्लंघन केले आहे. ड्रेनेज विभागाच्या पत्राला बांधकाम व स्थापत्य विभागाने दुर्लक्ष करत नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलून बांधकाम परवानगी देण्यात आली. त्या जागेतील विहिर पार्किंगमध्ये ठेवत त्यावरच गृहप्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात गृहप्रकल्पातील नागरिकांचे जीव धोक्यात येणार आहेत.































