चिंचवड प्रतिनिधी:-
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ मधील विकास नगर, बापदेव नगर, दत्तनगर, किवळे, रावेत, वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा परिसर, साईनगर तसेच मामुर्डी या भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने, अपुरा व अवेळी होत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन गरजांसाठी मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सदर परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, या गंभीर समस्येची आपण तात्काळ दखल घेऊन संबंधित भागातील पाणीपुरवठा नियमित, पुरेशा दाबाने व वेळेवर सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी असे निवेदन नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी सहशहर अभियंता सुर्यवंशी यांना दिले आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की २२ ऑक्टोबर पर्यंत प्रभागातील पाणी पुरवठा सुरळीत व नियमित करण्यात यावा वीज खंडित झाल्याने पाणीपुरवठा खंडित होऊ नये यासाठी पंपिंग स्टेशन वर जनरेटर बसवून उपाययोजना कराव्यात. अन्यथा, नागरिकांच्या वतीने दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी हंडा मोर्चा काढण्यात येईल. या आंदोलनास व त्यातून उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस तसेच पुढील सर्व परिणामांना संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी प्रशासनाला दिला आहे.






























